मुंबई - भारतातील ४८ टक्के महिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे एका सर्व्हेक्षणात समोर आले आहे. यावर शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी आक्षेप घेतला आहे. जगातील महिलांचा सर्वे करून त्यातून तथाकथित आकडेवारी घोषित करून भारतीय महिलांची बदनामी करणात येत आहे. यामुळे फ्रान्समधील ‘एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग ॲप’वर बंदी घाला, अशी मागणी डॉ. मनीषा कायंदे यांनी केली. त्या विधानपरिषदेत बोलत होत्या.
महिलांची बदनामी करणाऱ्या अॅपवर कारवाई करावी -
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर, विधान परिषदेच्या कामकाजाच्या प्रारंभी डॉ. मनीषा कायंदे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. यासंदर्भातील वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. मार्केटिंगसाठी संबंधित अॅपने भारतीय महिलांची बदनामी केल्याचा आरोप कायंदे यांनी केला. तसेच अशा प्रकारचे अॅप तत्काळ बंद करावेत, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, राज्य सरकारच्या वतीने याबाबत केंद्र सरकारला या 'ॲप'वर बंदी घालण्याची मागणी केली जाईल, असे महिला आणि बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - महाराष्ट्र अर्थसंकल्प : मराठवाड्यातील उद्योजकांच्या या आहेत अपेक्षा
चीनच्या 'ॲप'वर केंद्र शासनाने बंदी घालावी - रामराजे नाईक निंबाळकर
संबंधित 'ॲप'वर बंदी घालण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही. तरी शासनाने त्याविषयी केंद्र सरकारकडे मागणी करावी. शासनाने हा विषय गांभीर्याने घ्यावा. केंद्र शासनाने चीनच्या 'ॲप'वर ज्याप्रमाणे बंदी घातली, त्याप्रमाणे या 'ॲप'वर बंदी घालावी. हे वृत्त ज्या प्रसिद्धीमाध्यमांनी दिले, त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागण्यात यावे, अशा सूचना सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या.
हेही वाचा - यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य आणि शिक्षणावर खर्च वाढविण्याची आवश्यकता - अजित अभ्यंकर