मुंबई- कोरोनाच्या संसर्गामुळे गंभीर होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत चालली असली तरी ही संख्या शून्यावर आणण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करणे आता गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याबरोबरच फुफ्फुस मजबूत करण्यावर भर देणे ही काळाची गरज असल्याचे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कारण कोरोना विषाणू पहिला हल्ला फुफ्फुसावरच करतो.
कोरोनाचा आजार बळावल्यास फुफ्फुसात पाणी होऊन पुढे एक-एक अवयवावर त्याचा परिणाम होतो. त्यानंतर रुग्ण गंभीर होऊन यातील काहींचा मृत्यू होतो, असे चित्र गेल्या चार महिन्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळेच योग्य आहार आणि व्यायाम करत फुफ्फुस विषाणूविरोधात लढण्यासाठी मजबूत करा. कारण भविष्यात कोरोनासारखे अनेक विषाणू येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
कोरोना विषाणू नाका-तोंडावाटे शरीरात गेल्यानंतर त्वरित उपचार केले तर कोरोनातून आठवड्याभरात रुग्ण बरे होत आहेत. त्यातही ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे त्यांना तर कोरोनात कुठलाही आजार होताना दिसत नाही. मात्र,असे असले तरी कोरोनाच काय कुठल्याही विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी फुफ्फुसाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे, फुफ्फुस मजबूत हवेत, अशी माहिती ज्येष्ठ हृदयविकार तज्ज्ञ डॉ. विजय सुरासे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
कुठलाही विषाणू आधी फुफ्फुसावरच हल्ला करतो. त्यामुळे जर संसर्ग झाल्याबरोबर त्या विषाणूला परतवून लावण्यासाठीची श्वसननलिकेतील बिटिंग मेकॅनिझम तयार नसेल तर मग विषाणू फुफ्फुसात शिरतो. त्यानंतर फुफ्फुसाची लवचिकता कमी करतो आणि फुफ्फुसातील पोकळीत हवा भरते. त्यानंतर मग फुफ्फुसात पाणी होते. एकूणच फुफ्फुस निकामी होण्यास सुरुवात होते. फुफ्फुसातील लवचिकता कमी झाल्याने श्वसनाला त्रास होतो. त्यानंतर शरीरातील ऑक्सिजन कमी होऊन पुढे मांसपेशी आणि इतर अवयवांवर त्याचे दुष्परिणाम होऊ लागतात. गंभीर कोरोना रुग्णांमध्ये हीच बाब दिसून येत आहे. जे काही मृत्यू होत आहेत, त्यात अधिक मृत्यू हे अशाप्रकारे आजार बळावल्यानेच होत आहेत. पण यातूनही बरे होणाऱ्याची संख्या लक्षणीय आहे. तेव्हा याला घाबरुन न जाता त्याच्याशी लढण्याची गरज असल्याचेही डॉ. सुरासे सांगतात.
कोरोनासारखे अनेक विषाणू दर पाच-दहा वा वीस वर्षांनी आता येतच राहणार आहेत. त्यामुळे या विषाणूशी लढण्यासाठी नागरिकांनी त्यातही तरुण, नव्या पिढीने रोगप्रतिकारक शक्ती वाढवत फुफ्फुस मजबूत करण्यावर आता विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असेही डॉ. सुरासे सांगतात. फुफ्फुस मजबूत करण्यासाठी त्यात बिटिंग मॅकॅनिझम सिस्टीम तयार व्हायला हवी. ही सिस्टीम म्हणजे तुमच्या शरीरात व्हिटामिन सी, कॅल्शियम, डी थ्री, व्हिटामिन बी कॉम्प्लेक्स आणि प्रोटीन या पाच सत्वांचे कवच तयार व्हायला हवे. यासाठी ही सत्वे ज्यातून मिळतात असा आहार घेणे गरजेचे आहे. दूध, अंडी, चिकन, मासे, लिंबू, आवळा, हिरव्या पालेभाज्या, फळे यांचे सेवन दररोज आहारात अंतर्भूत करावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तर प्राणायाम, बैठी आसने, जिथे लोकांची गर्दी नसेल अशा ठिकाणी चालायला जा. त्यातही दररोज 5 ते 6 मजले उतरणे-चढणे केल्यास फुफ्फुस नक्कीच मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे कुठल्याही विषाणूपासून बचाव करण्यासाठी आधी फुफ्फुसाची शक्ती वाढवणे हाच एकमेव उपाय असल्याचेही ते सांगतात.