मुंबई - मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा कुर्ला आणि सायन येथे पावसाचे पाणी साठल्याने बंद करण्यात आली आहे. दरम्यान, नाले स्वच्छ न झाल्याचा फटका रेल्वे सेवेला बसल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे. मागील 12 वर्षांत 30 कोटींहून अधिक रक्कम रेल्वेच्या 116 नाल्यांवर खर्च करण्यात आले असून, 30 कोटी पाण्यात वाहून गेले असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
'नाले स्वच्छ न झाल्याचा रेल्वेला फटका'
मुंबईतील रेल्वे अंतर्गत नाल्या प्रत्येक वर्षी रेल्वे प्रशासन स्वच्छ करते. पालिका प्रत्येक वर्षी 3 ते 4 कोटी रुपये यासाठी खर्च करते. मागील 12 वर्षात रेल्वेला 30 कोटी प्राप्त झाले आहेत. मात्र, आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे ऑडिट ना रेल्वेने केले, ना पालिकेने केलेल्या खर्चाचा हिशोब मागितला. आज मुंबई रेल्वे सेवेअंतर्गत 116 नाले असून, 53 मध्य रेल्वे, 41 पश्चिम रेल्वे आणि 22 हार्बर रेल्वेत आहेत. वर्ष (2009-2010) ते वर्ष (2017-18) या 9 वर्षात 23 कोटी रुपये मुंबई पालिकेने रेल्वे प्रशासनाला दिले होते. वर्ष (2018-19)मध्ये 5.67 कोटी रुपये दिले होते. एकंदरीत मागील 12 वर्षात 30 कोटीहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. यावर्षी पालिकेने सीएसएमटी ते मुलुंडपर्यंतच्या रेल्वेच्या सर्व नाल्यांची सफाई अवघ्या 15 दिवसांत पूर्ण करण्याचा दावा केला आहे.
'नाले सफाईचे ऑडिट होत नाही'
दरवर्षी पावसाळयापूर्वी पालिका रेल्वेला पैसे देते. मात्र, या नाले सफाईचे कुठल्याही प्रकारचे ऑडिट होत नाही. मागील 3 वर्षांपासून रेल्वे सेवा हमखास कुर्ला आणि सायन दरम्यान ठप्प होते. परंतु, (31 मे) पर्यंत मोरी साफ करून सर्वेक्षण केल्यास अशी परिस्थिती उद्भवणार नाही. मात्र, सध्याच्या परिस्थितीला महापालिका आणि रेल्वे तितक्याच प्रमाणात जबाबदार आहे. असे अनिल गलगली म्हणाले आहेत. तसेच, रेल्वे असो किंवा पालिका, दोन्ही एजन्सीने करण्यात आलेला खर्च, काढलेला गाळ याची इत्थंभूत माहिती जनतेच्या माहितीसाठी ऑनलाइन करणे आवश्यक असल्याचे मतही गलगली यांनी व्यक्त केले आहे.
'रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी घेतली दखल'
नुकतेच भाजप नेते आशिष शेलार यांनी उपनगरीय रेल्वे मार्गावरील नालेसफाई झाली नसल्याची माहिती, केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या निदर्शनात आणली होती. त्याची दखल घेत, रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी उपनगरीय लोकल मार्गांवर नालेसफाई आणि मान्सूनपूर्व कामाची पाहणी करण्याचे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबतची माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून देण्यात आली आहे.