मुंबई : Bihari Workers Mumbai : बिहारमधून देशाची आर्थिक राजधानी मुंबईत रोजगाराच्या शोधात येणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. बिहारमध्ये राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी १५ लाखांहून अधिक कामगारांनी नोदणी केली असल्याचा दावा, बिहारचे मंत्री समीर महासेठ (Sameer Mahaseth) यांनी आज मुंबईत केला. कोरोनानंतर आपापल्या घरी परतलेल्या बहुतांश लोकांनी आता बिहारमध्ये राहून रोजगार सुरू केला आहे. उदरनिर्वाहासाठी मुंबईत परतलेले फार कमी कामगार आहेत. असं महसेठ यांनी इन्व्हेस्टर समिटनंतर (Global Investors Summit 2023) पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.
बिहारच्या पोर्टलवर जोरदार नोंदणी : बिहार सरकारनं सुरू केलेल्या रोजगार पोर्टलमध्ये आतापर्यंत 15 लाख 29 हजार लोकांनी विविध नोकऱ्यांसाठी नोंदणी केली आहे. त्यांचं वय 35 वर्षांपेक्षा कमी आहे. केवळ मुंबईतच नाही तर देशाच्या इतर भागांतून परतणाऱ्या बिहारींची संख्या वाढली आहे. बिहारमध्ये परतलेल्या कामगारांना आता आपली घरे सोडायची नाहीत आणि त्यांनी बिहारमध्येच आपला रोजगार सुरू केला आहे. त्यांना राज्यात राहून रोजगार व इतरांसाठी रोजगार निर्माण करायचा आहे. बिहार सरकारनं राज्यातील स्थलांतरित मजुरांसाठी बिहारमध्येच 40,000 लघु उद्योगांसाठी नवीन प्रस्ताव आणला आहे. जेणेकरून राज्यात अधिकाधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देता येईल. नितीश कुमार यांच्या सरकारला बिहारची प्रतिमा बदलायची आहे.
बिहारची लोकसंख्या वाढली : बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे की, बिहारमधील लोकसंख्या वाढली आहे. त्यांच्यामध्ये असे अनेक लोक आहेत जे कोरोनाच्या काळात बिहारमध्ये परतले होते. बिहारमधील लोकांना आता कुटुंबासह राहायचं आहे. मुंबईत सुरू असलेल्या बिहार गुंतवणूक समिटमध्ये, उद्योग विभागाचे संचालक पंकज दीक्षित म्हणाले की, ऊर्जेच्या वाढत्या मागणीसह, बिहारनं जैव-इंधनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य बनण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. बिहारमध्ये जैवइंधनासाठी 33 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 17 मंजूर झाले आहेत आणि पाच काम सुरू झाले आहेत. जैवइंधनाच्या वापरासोबतच शाश्वत औद्योगिक विकास करण्याचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं.
कंपन्यांना करणार आमंत्रित : बिहारच्या उद्योग विभागाच्या या गुंतवणूकदारांच्या बैठकीत बिहारमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना सर्व लॉजिस्टिक सपोर्ट उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगण्यात आलं आहे. बिहार इंडस्ट्रीजचे संचालक पंकज दीक्षित म्हणाले की, मुंबई इन्व्हेस्टर समिटमध्ये 40 हून अधिक गुंतवणूकदारांनी बिहारमध्ये गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवली आहे. ज्यामध्ये अरिस्टो, अल्केम, गोदरेज, कामत यांच्यासह अनेक औद्योगिक समूहांनी बिहारमध्ये गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवली आहे. 13 आणि 14 डिसेंबर रोजी राज्यात होणाऱ्या ग्लोबल इन्वेस्टर समिटसाठी (Global Investors Summit 2023) अनेक कंपन्यांना आमंत्रित केलं आहे.
हेही वाचा -
बिहारच्या मंत्र्याने रिया चक्रवर्तीला म्हटले, 'विषकन्या, सुपारी किलर'