मुंबई - करी रोड येथिक पिंपळेश्वर कृपा या सोसायटीत राहणाऱ्या राम जैस्वाल (७०) यांना काल रात्री श्वास घेण्यास त्रास झाल्याने परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नंतर त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह शवागारात ठेवण्यात आला होता. मृत राम जैस्वाल यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली. आज सकाळी १० वाजताच्या सुमारास मृतदेह ताब्यात घेण्यास गेले असता मृतदेह सापडला नाही. त्यानंतर रुग्णालय प्रशासन मृताच्या नातेवाईकांना हाच मृतदेह असून घेऊन जाण्यासाठी जबरदस्ती करत होते. मात्र, नातेवाईकांना तो मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर केईएम रुग्णालयाने शोधाशोध केल्यानंतर राम जैस्वाल यांचा मृतदेह नालासोपारा येथे चुकून गेला असल्याचे सांगितले.
केईएम रुग्णालयाचा भोंगळ कारभार - याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, याप्रकरणी चौकशी केली जाईल. चौकशीअंती जो कोणी दोषी आढळेल त्यावर कारवाई केली जाईल. मात्र, केईएम रुग्णालयाच्या या भोंगळ कारभारामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या जैस्वाल कुटुंबीयांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नाहक त्रास झाला आहे. राम यांचा मृतदेह नालासोपारा येथून पुन्हा केईएम रुग्णालयात आणण्यात येणार असून त्यानंतर तो जैस्वाल कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी - नुकतेच पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात अदलाबदलीप्रकरणी दोषी कंत्राटी कर्मचाऱ्यास कामावरून काढून टाकण्यात आले होते. तर, महापालिका आस्थापनेवरील एका कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी करण्यात येत आहे. संबंधित ठेकेदारावरही कारवाई केली जाणार आहे, असे प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले होते. हा प्रकार १९ ऑक्टोबर २०२२ ला घडला होता. त्यामुळे शहरात खळबळ माजली होती. हे प्रकरण ताजे असतानाच मुंबईत देखील असा प्रकार घडल्याने मृताच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त होत आहे.
केईएम रुग्णालयाचा बेजबाबदार - याप्रकरणी केईएम रुग्णालयाची बाजू मांडण्यासाठी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांना संपर्क साधला असता होऊ शकला नाही. मात्र, रुग्णाचे नातेवाईक याबाबत रुग्णालयातील अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास गेले असता त्यांचे आरोप फेटाळून लावण्यात आले. नालासोपारा येथे रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्या रुग्णाच्या मृतदेहाऐवजी करी रोड येथील वृद्ध राम याचा मृतदेह नेला असल्याचे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास केईएम रुग्णालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे केईएम रुग्णालयाचा बेजबाबदारपणा उघडकीस आला असल्याचे त्याचे म्हणणे आहे.