मुंबई - महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडचे काम सुरू आहे. कोस्टल रोडसाठी दोन भुयारी बोगदे खणले जाणार आहेत. हे बोगदे 'मावळा' या टीबीएम मशीनद्वारे खणले जाणार असून त्याचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी (दि. 11 जाने.) केला जाणार आहे.
मुंबईत पश्चिम उपनगरातून शहरात येण्यास तीन तासांचा कालावधी लागतो. यामुळे नागरिकांचा वेळ वाया जातो तसेच इंधनही मोठ्या प्रमाणात खर्च होते. यावर उपाय म्हणून अमरसन्स गार्डन प्रिन्सेस स्टिट ब्रिजपासून कोस्टल रोड उभारला जात आहे. या रोडवर दोन बोगदे असणार आहेत. त्या बोगदे खणण्याच्या कामाचा शुभारंभ उद्या (सोमवार) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
"मावळा" खोदणार बोगदे
कोस्टल रोड पूल व भुयारी मार्गाद्वारे उभारला जात आहे. त्यासाठी समुद्राखालून 400 मीटरचे बोगदे असणार आहेत. हे बोगदे खोदण्यासाठी चायना मेड मशीन आणण्यात आली आहे. या मशीनचा व्यास 39.6 फूट आहे. भारतातील सर्वात मोठा व्यास असलेली ही मशीन आहे. या मशीनला "मावळा", असे नाव देण्यात आले आहे. ही मशीन पूर्ण तयार झाली असून बोगदे खोदण्यास सज्ज झाली आहे. कोस्टल रोडसाठी समुद्राखालून 400 मिटरचे बोगदे खोदण्याचे काम उद्यापासून सुरू होईल. एक बोगदा खोदण्यासाठी 9 महिन्याचा कालावधी लागणार असून 18 महिन्यात कोस्टल रोडसाठी दोन बोगदे खोदून तयार होणार आहेत.
17 टक्के काम पूर्ण, 1 हजार 281 कोटी खर्च
मुंबईमधील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून शहरातून पूर्व उपनगरात जाण्यासाठी फ्री वे बनवण्यात आला आहे. त्यानंतर पश्चिम उपनगरात जाण्यासाठी कमी वेळ लागावा म्हणून कोस्टल रोड बांधण्यात येणार आहे. कोस्टल रोडचे काम तीन टप्यात होणार असून अमरसन्स गार्डन प्रिन्सेस स्टिट ब्रिज ते वरळी सिलिंक, असा पहिला टप्पा मुंबई महापालिका तयार करत असून यासाठी पालिका 12 हजार 721 रुपये खर्च करणार आहे. कोस्टल रोडचे काम वेगाने सुरू असून 17 टक्के पूर्ण झाले आहे. त्यासाठी आतापर्यंत 1 हजार 281 कोटी खर्च करण्यात आले आहेत. कोस्टल रोडचे काम 2023 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.
समुद्रात भराव
कोस्टल रोडच्या कामासाठी अरबी समुद्रात सुमारे 300 एकर जमिनीवर भराव टाकला जाणार आहे. त्यापैकी 175 एकर जागेवर भराव टाकण्यात आला आहे. अजून 102 एकर जागेवर भराव टाकण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली.
हेही वाचा - राज ठाकरेंची सुरक्षा कमी केल्याने मनसेसैनिक संतप्त
हेही वाचा - भंडाऱ्यातील दुर्घटनेवरून राज्यातील रुग्णालयांचा अग्नीसुरक्षेचा आढावा