मुंबई - महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांचे वादग्रस्त कार्टून काढून ते समाज माध्यमावर फॉरवर्ड करणाऱ्या मर्चंट नेव्हीच्या एका माजी अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्याचे प्रकरण राज्यपाल भवनापर्यंत गेले होते. मात्र, चार वर्षांपूर्वी भाजपच्या तत्कालीन आमदाराने आणि विद्यमान खासदाराने चाळीसगावमधील येथील एका माजी सैनिकाला मारहाण केली होती. त्या मारहाणीनंतर त्यांना अजूनही न्यायासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे प्रकरण पुढे आले आहे. न्यायालयाने या भाजपच्या खासदारावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊनही अद्यापही कारवाई झाली नाही. या प्रकरणात कारवाई व्हावी यासाठी महाजन यांनी गुरुवारी राज्याच्या गृहमंत्र्यांच्या जनता दरबारात आपली कैफियत मांडली. त्यानंतर न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या सोनू महाजन या माजी सैनिकाने आपल्यावर घडलेला प्रसंग आणि त्यामुळे आलेली आपबिती 'ईटीव्ही भारत'पुढे मांडली आहे.
माजी सैनिक सोनू महाजन यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख यांची गुरुवारी जनता दरबारात भेट घेतली. या भेटीनंतर देशमुख यांनी त्यांना याविषयी न्याय मिळेल,असे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाचे तत्कालीन आमदार उन्मेष पाटील आणि त्यांच्या साथीदाराने आपल्याला आपल्यावर जीवघेणा हल्ला केला. मारहाण केली त्यामुळे कुटुंबाची वाताहत झाली. आपल्यालाच मारहाण झालेली असताना उलट माझ्यावरच गुन्हे दाखल करून मला जेलमध्ये टाकण्यात आले. पोलीस, सरकार आणि कोणतीही यंत्रणा आपल्याला त्यावेळी मदतीला धावून येत नव्हती. यामुळे पाच महिने मला जेलमध्ये काढावे लागले. तर दुसरीकडे माझ्या पत्नीला सुद्धा आपला जीव मुठीत धरून अत्यंत वाईट अवस्थेत जगावे लागले असल्याचे व्यथा महाजन यांनी यावेळी सांगितली.
महाजन म्हणाले, उन्मेष पाटील आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी मला मारहाण केली आणि आमच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. इतकेच नाही तर माझ्या पत्नीलाही सोडण्यात आले नाही. तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. उन्मेष पाटील याचे नाव घेऊ नको नाहीतर याचे परिणाम वाईट होतील, अशा धमक्या मला पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यावेळी देण्यात आल्या. पण आम्ही ऐकले नाही. हे लक्षात आल्याने दुसऱ्या दिवशी पोलिसांनी पाच जिल्ह्यातून तडीपार करण्याची नोटीस माझ्यावर बजावली. यामुळे घरदार, गाव सुटले आणि न्यायासाठी आम्हाला भटकावे लागले. आम्ही न्यायासाठी वणवण फिरलो. परंतु आम्हाला कोणीही दाद दिली नाही. शेवटी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि न्यायालयाने भाजपाच्या त्या आमदारावर मागील वर्षी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. परंतु अजूनही त्यावर कार्यवाही झाली नसल्याने आम्हाला आज गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्यासाठी न्याय मिळावा, अशी मागणी केली असल्याचे महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, सोनू महाजन यांच्या पत्नीलाही खूप त्रास सोसावा लागला. त्या म्हणाल्या, आमच्यावरच मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी माझ्यावरसुद्धा 307 चा गुन्हा दाखल केला होता मलाही जेलमध्ये टाकण्याची त्यांची रणनीती होती. परंतु मी निघून गेल्यामुळे त्यातून वाचले आणि नऊ महिन्यानंतर मला न्यायालयातून जामीन मिळाला. मात्र या काळात माझ्या मुलाचे शिक्षण बुडाले आणि संसाराची सगळी वाताहत झाल्याची त्या म्हणाल्या. सैनिकाची पत्नी असल्याने मला न्यायव्यवस्थेवर विश्वास होता. म्हणूनच मी न्यायालयात गेले आणि न्यायालयाने आमच्यावर मारहाण करणाऱ्या भाजपाच्या त्या आमदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. परंतु आतापर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.