मुंबई - पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या १२ दिवसानंतर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी एलओसीजवळील जैश-ए-महंमदच्या दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्याबद्दल माजी लष्कर अधिकारी राजन फडके यांनी हवाई दलाचे कौतुक केले आहे. भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खानवर सध्या जोरदार टीका होत आहे. या परिस्थितीचा फायदा घेवून पाकिस्तानी सेना सत्ता हातात घेवू शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
भारत जमिनावरून हल्ला करेल असे पाकिस्तानला वाटत होते. मात्र, भारताने सीमेपार घसून हवाई हल्ला केला. दहशतवाद्यांना आश्रय देणारा पाकिस्तान जगात एकटा पडला आहे. यासंदर्भात चीननेही पाकिस्तानला साथ दिली नाही, असे म्हणत त्यांनी राजकीय खळबळ माजण्याची शक्यता व्यक्त केली. या हल्ल्यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद पुन्हा एकदा दिसून आली. मिराज-२००० या लढाऊ विमानांची क्षमताही दिसून आली आहे, असे मत फडके यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले आहे.
भारतीय सेनेकडून सीमा रेषेचे उल्लंघन करणे गंभीर आहे. पाकिस्तानचे या सर्व परिस्थितीवर लक्ष आहे. आम्हाला पण या हल्ल्याचा प्रतिकार आणि स्वत:चे संरक्षण करण्याचा अधिकार आहे, असे मत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी व्यक्त केले. पाकिस्तानमध्ये प्रचंड हालचालींना वेग आला असून पाकिस्तानने तत्काळ संसदेचे संयुक्त सत्र बोलावले आहे.