मुंबई - कोरोनाचे संकट डोक्यावर असताना ऐन खरीपाच्या तोंडावर थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांचे थकीत कर्ज 'राज्य शासनाकडून येणे' दाखवून बँकांनी त्यांना खरीप हंगामासाठी नव्याने पीक कर्ज द्यावे, असे स्पष्ट आदेश सरकारने जारी केले आहेत.
जिल्हा बँका तसेच व्यापारी आणि ग्रामीण बँकांना उद्देशून तसा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना हंगामासाठी पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचा राज्यभरातील सुमारे अकरा लाख शेतकऱ्यांना लाभ होईल, असे सांगण्यात आले.