मुंबई - मुंबईसह राज्यभरात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच महाराष्ट्र सरकारने २२ एप्रिलच्या रात्रीपासून महाराष्ट्रभर कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने परप्रांतीय मजूर राहतात आणि काम करतात. दुसऱ्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये परप्रांतीय मजुरांनी आपल्या गावाची वाट धरलेली आहे. मुंबईच्या एलटीटी रेल्वे स्थानकावरती कालसुद्धा तुरळक प्रमाणात परप्रांतीय मजुरांनी आपल्या गावी जाण्यासाठी धावपळ सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या योग्य सहकार्यामुळे यंदा गर्दीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली नाही.
हेही वाचा - राज्यात खाजगी वाहनांच्या नोंदणी १ मेपर्यंत बंद
लॉकडाऊन अंतर्गत रस्त्यावर कोणतीच खासगी वाहने दिसणार नाहीत याची काळजी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र प्रशासन घेत आहे. लॉकडाऊनमुळे मुंबई परिसरातील उद्योगधंदे, बाजारपेठा बंद झाल्या आहेत. परिणामी, हाताला काम नसल्यामुळे कामगारांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. दुकाने त्याचबरोबर इतर काम बंद झाले आहेत. काम धंदा नसल्याने शहरात राहणे सोयीचे होणार नाही, त्यामुळे या ठिकाणी उपाशी जगण्यापेक्षा मूळ गावाकडे परतण्यास कामगारांकडून पसंती देण्यात येत आहे. त्यामुळे, रेल्वे, बस स्थानकातील गर्दी वाढली आहे.
उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट
गतवर्षी मार्च महिन्यात संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आले होते. तेव्हा सर्व राज्यासह परराज्यांतील वाहतूक सुविधा बंद करण्यात आली होती. त्यामुळे, कामगार वर्ग आपल्या मूळ गावी परतू शकला नाही. तर, काहींनी मिळेल ते वाहन पकडून गाव गाठले, तर काहींनी पायीच गावाची वाट धरल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरात राहिलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ ओढावली होती. जवळ असलेली सर्व जमापुंजी संपल्याने मुंबईमध्ये राहून दिवस काढणे कठीण झाले होते. उद्योगधंद्यांवर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सद्यपरिस्थिती बिकट बनला आहे. त्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही तीच परिस्थिती उद्भवल्याने या भीतीने कामगार गरीब मजुरांनी गावी जाण्यासाठी मुंबई शहरातून काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून मुंबई मधील एलटीटी रेल्वे स्थानकावर गावी जाणाऱ्या प्रवाशांनी गर्दी केली होती. मंगळवारी तर मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली होती. दररोज गावी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
योग्य व्यवस्थापनामुळे मुंबई एलटीटीवर गर्दी कमी
बिहार उत्तर प्रदेश घाटमाथ्यावर परप्रांतीय मजुरांची जाण्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे, मुंबईसह मुंबई उपनगरीय भागात राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांनी कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसवरून गावी जाण्यासाठी खूप गर्दी केली होती. यात गोरखपूरला जाणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर, बसस्थानक आणि रेल्वे स्थानकात घाटमाथ्यावरील लातूर, पुणे, नगर, औरंगाबाद, परभणी, यवतमाळ, बुलडाणा येथे जाणारे प्रवासी गर्दी करत आहेत. परप्रांतीय बांधव आपल्या कुटुंबासोबत परत गावी जात आहे. परंतु, रेल्वे प्रशासनाकडून यंदाच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये योग्य व्यवस्थापन करण्यात आल्यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनसवर जास्त प्रमाणात गर्दी झाली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली नाही. त्यामुळे, प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाचे आभार देखील मानले आहे.
हेही वाचा - राज्यात कोरोनाच्या नव्या 66 हजार 836 रुग्णांची नोंद; 773 रुग्णांचा मृत्यू