मुंबई - कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 चे कारशेड आरे जंगलातून कांजूरमार्ग येथे हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयानंतर विधानसभेची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे. ही जागा पाणथळ असून या जागेमुळे 4000 कोटींचा खर्च वाढेल असा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपांना पर्यावरणप्रेमी आणि आरे कारशेडविरोधातील याचिकाकर्त्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. याबाबत ईटीव्ही भारतेने घेतलेला हा विशेष वृत्तांत..
कांजूरमार्गची जागा जर वादग्रस्त आहे, पाणथळ आहे तर मग स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6 चे कारशेड याच जागेवर बनवण्यासाठी तुम्ही कशी परवानगी दिली? आपल्याच काळात, आपण मुख्यमंत्री असतानाच हीच जागा अंतिम करण्यात आली ना? असा सवाल आता याचिकाकर्त्यांनी खास 'ईटीव्ही भारत' ला दिलेल्या मुलाखतीद्वारे फडणवीस यांना केला आहे. तर फडणवीस असो वा भाजपचे कोणतेही नेते त्यांचे सर्व आरोप बिनबुडाचे असून त्यांचे सर्व आरोप आम्ही खोडुन काढू, त्यांनी आमच्याशी चर्चा करावी असे खुले आव्हानही त्यांनी फडणवीस यांना दिले आहे.
काय आहे प्रकरण-
मुंबईच्या मेट्रो-३ प्रकल्पासाठी कारशेड निर्माण करण्यासाठी आरे जंगलाची निवड तत्कालीन फडणवीस सरकारने केली होती. मात्र पर्यावरण वाद्यांनी याला विरोध करत मोठा लढा उभारला होता, यावर सरकारने दडपशाहीचे धोरणाचाही अवलंबल होते. त्यानंतर ठाकरे सरकारने आरेतील कामाला स्थगिती दिली.
आरे कारशेडवरून गेली सात वर्षे वाद सुरू होता. आरेतून कारशेड इतरत्र हलवावे आणि जंगल वाचवावे अशी मागणी करत पर्यावरण प्रेमी न्यायालयात गेले होते. तर रस्त्यावरची ही लढाई सुरू होती. अखेर ही लढाई यशस्वी ठरली आहे. मुख्यमंत्र्यांनी अखेर आरेतून कारशेड कांजूरला हलवले आहे. या निर्णयामुळे पर्यावरण प्रेमी-आरेतील आदिवासी बांधव आनंदी आहेत. पण दुसरीकडे मात्र यावरून राजकारण मात्र चांगलेच पेटले आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यातही फडणवीस यांनी यावरून शिवसेनेला, मुख्यमंत्र्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच हा निर्णय केवळ अहंकारातून घेतल्याच्या टीकेपासून ते यामुळे मेट्रो 3 चे काम 5 वर्षे रखडेल, 4000 कोटीचा भुर्दंड पडेल, आरेतील 400 कोटींचा खर्च वाया जाईल, कांजूरची जमीन वादग्रस्त आहे, पाणथळ आहे, महाविकास आघाडीनेच स्थापन केलेल्या समितीने कांजूरची जागा कारशेडसाठी योग्य नसल्याचा अहवाल दिला होता, असे अनेक आरोप फडणवीस यांनी करण्यास सुरुवात केली आहे. तर यावरून पर्यावरणप्रेमी विरुद्ध फडणवीस असे ट्विटर वॉर पाहायला मिळत आहे.
ही जागा पाणथळ नाही-
फडणवीस यांच्याकडून केल्या जाणाऱ्या या सर्व आरोपांना पर्यावरणप्रेमी आणि आरे कारशेडविरोधातील याचिकाकर्ते स्टॅलिन दयानंद आणि रोहित जोशी यांनी उत्तरे दिली आहेत. त्यानुसार कांजूरमधील जागा पाणथळ नाही वा तिथे एकही तीवराचे झाड नाही. कांजूरची जागा दोन भागात विभागली आहे. कांजूरच्या जागेचा एक भाग द्रुतगती मार्गाच्या एका बाजूला तर एक बाजू दुसऱ्या बाजूला आहे. ज्या जागेवर कारशेड उभारण्यात येत आहे तिथे कुठेही तीवरे नाहीत. तीवरे ही दुसऱ्या बाजूच्या जागेवर आहेत. तर ही जागा मुळीच पाणथळ नाही, अशी माहिती आरे कारशेड विरोधातील याचिकाकर्ते स्टॅलिन यांनी दिली आहे.
कांजूरच्या जागेला फडणवीस यांनीच 'या' मार्गासाठी दिला होता हिरवा कंदील
ज्या कांजूरच्या जागेवर मेट्रो 3 चे कारशेड उभारण्यास फडणवीस हे विरोध करत आहेत, त्याच जागेवर एका दुसऱ्या मेट्रो मार्गाचे कारशेड बांधण्यास फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असताना मंजुरी दिली आहे. हा मार्ग म्हणजे स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6. या मार्गाला भाजपच्या काळातच परवानगी देण्यात आल्याची माहितीही स्टॅलिन यांनी दिली आहे. ही जागा जर योग्य नाही, ही जागा वादग्रस्त, पाणथळ आहे, तर मग तुम्ही मेट्रो 6 चे कारशेड येथे उभारण्यास का हिरवा कंदील दिला ? असा सवालच स्टॅलिन यांनी केला आहे.
पैसे वाढवणार नाही तर वाचणार
फडणवीस यांनी केलेला आणखी एक आरोप म्हणजे कांजूरच्या जागेवर कारशेड नेल्याने 4000 कोटींचा भुर्दंड वाढणार आहे. फडणवीस यांनी हा आकडा कुठून आणि कसा आणला हे माहिती नाही. पण या जमिनीसाठी एमएमआरसीला एक पैसा द्यावा लागणार नाही. उलट मेट्रो 3 आणि मेट्रो 6 चे एकत्रिकरण केले जाणार आहे. त्यामुळे आता दोन मार्ग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. तर दोन मार्गाचे कारशेड एकाच ठिकाणी होणार असल्याने उलट खर्च वाचणार असल्याची प्रतिक्रिया आरे कारशेडविरोधातील आणखी एक पर्यायवरणप्रेमी आणि याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी दिली आहे. तर मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय सर्व दृष्टीने मुंबईकरांच्या फायद्याचा ठरणार असल्याचेही जोशी यांनी सांगितले आहे.
फडणवीस आणि किरीट सोमय्या यांनी इथं येऊन जागा पाहावी
फडणवीस आणि किरीट सोमय्या हे कांजूरला कारशेड हलवल्यापासून शिवसेनेला, मुख्यमंत्र्यांना थेट टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. तेव्हा शिवसैनिकही आता आक्रमक झाले आहेत. फडणवीस आणि किरीट सोमय्या यांनी आरोप करण्यापेक्षा इथं यावं, मग सांगावं की ही पाणथळ जागा आहे, यावर तीवरं आहेत. माझं त्यांना खुलं आव्हान आहे आरोप करण्याऐवजी इथं येऊन पाहावं आणि मग आरोप करावेत असे म्हणत शिवसेनेचे कांजूर येथील शाखाप्रमुख इंद्रजित गवस यांनी भाजपला सडेतोड उत्तर दिले आहे.