मुंबई- आरे जंगलात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा मोठ्या प्रमाणात झाडे कापत वा जाळत झोपड्या बांधल्या जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला. मात्र, आरेत कुठेही अतिक्रमण होत नसल्याचे म्हणत आरे कॉलनी प्रशासनाने आरोप धुडकावून लावला आहे.आता यावरून प्रशासन आणि पर्यावरणप्रेमी असा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे.
मुंबईचे फुफ्फुस म्हणून आरे कॉलनीतील जंगलाचे रक्षण करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींची आहे. सरकारकडून विविध प्रकल्प राबवत आरे जंगल नष्ट केले जात असल्याचे पर्यावरणप्रेमींचे मत आहे. यावरुन गेल्या काही वर्षापासून सरकार विरुद्ध पर्यावरणप्रेमी वाद पेटलेला आहे. लॉकडाऊनचा फायदा घेत झोपडपट्टी माफियांनी आरेत झाडे तोडत अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वनशक्ती संस्थेने याविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणावर अद्याप सुनावणी झालेली नाही, गेल्या आठवडयाभरापासून अतिक्रमण जोरात सुरू झाले आहेत, अशी माहिती वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी दिली.
अतिक्रमणाबाबत सर्व संबधित यंत्रणाकडे तक्रारही केली. अगदी आरे कॉलनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कुठे अतिक्रमण होत आहे याचे फोटो, लोकेशन ही पाठवले आहे. पण, अद्यापही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता पुढे कोणती कायदेशीर प्रक्रिया करायची याचा निर्णय लवकरच घेऊ, असेही स्टॅलिन यांनी सांगितले आहे.
आरे कॉलनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. व्ही. राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. झाडे तोडली जात नाहीत कुठेही अतिक्रमण होत नाही, यावर आमचे अधिकारी-कर्मचारी लक्ष ठेवून आहेत, असेही राठोड यांनी सांगितले आहे.
राठोड यांच्या या प्रतिक्रियेवर पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. तर यंत्रणांच्या अशा भूमिकेमुळेच झोपडपट्टी माफियांना रान मोकळे मिळत असल्याचाही आरोप स्टॅलिन यांनी केला आहे.