मुंबई - कोरोनाच्या काळात आर्थिक संकट गडद झाले आहे. अनेकजण आर्थिक अडचणीत आले आहेत. पण दुसरीकडे मात्र आजही महागडी घरे खरेदी करण्याकडे धनदांडग्याचा कल कायमच असल्याची बाब निदर्शनास आली आहे. कारण या आर्थिक संकटातही एका उद्योजकाने मलबार हिलमध्ये तब्बल 100 कोटींचे घर खरेदी केले आहे.
एका चौरस फुटासाठी त्याने किती पैसे मोजले हे ऐकूण अनेकांना भोवळ आल्यावाचून राहणार नाही. तर या घरासाठी या उद्योजकाने एका चौरस फुटासाठी तब्बल 1 लाख 51 हजार 961 रुपये मोजले आहेत. ही मालमत्ता खरेदी या वर्षातील मुंबईतील नव्हे तर देशातील सर्वात महाग खरेदी मानली जात आहे.
उद्योगपती राहुल बजाज यांचा पुतण्या अनुरंग जैन याने मलबार हिलमध्ये 100 कोटीला 6 हजार 371 चौरस फुटाचे घर खरेदी केले आहे. 9 जुलैला या घराची नोंदणी झाली आहे. नोंदणी दस्तानुसार कारमायकल रेसिडेन्सी इमारतीच्या 19 व्या मजल्यावर हे घर आहे. या घरासाठी जैन यांनी 5 कोटी मुद्रांक शुल्क मोजले आहे. रेडिरेकनरचा विचार केला तर या घराची किंमत 46 कोटी 43 हजार अशी विक्री किंमत आहे. मात्र, या इमारतीतील सुखसोयी लक्षात घेता धनदांडगे रेडिरेकनरपेक्षा दुप्पट दरात घर खरेदी करताना दिसतात. त्यामुळेच जैन यांनी एका फुटासाठी चक्क 1 लाख 51 हजार 961 रुपये मोजले आहेत.
2020 मधील मुंबईतील नव्हे तर देशातील ही महागडी खरेदी आहे. तर गेल्या दोन वर्षातील ही हे महागडे घर आहे. 2019 मध्ये लोढा अपार्टमेंटमध्ये मनीष पटेल यांनी 1लाख 29 हजार चौरस फूट दराने घर खरेदी केले होते. तर 2018 मध्ये ब्रीच कँडी येथे एकाने 1 लाख 49 हजार रुपये चौरस फुटाने 2 हजार 422 चौरस फुटाचे घर खरेदी केले होते.