मुंबई - बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा दगड डोक्यावर पडून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना चेंबूरच्या अमर महल पुलाजवळ घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी घटली असून यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलीचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विकासकाच्या हलगर्जीपणामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक राहिवाशांनी केला आहे.
हेही वाचा - पालिका शाळांमधील विद्यार्थी वह्यांपासून वंचित, युवासेनेच्या सद्स्याचा सेनेला घरचा आहेर
अमरमहाल पुलाजवळील पंचशील नगर येथील एसआरए प्रकल्पाअंतर्गत इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीत काही रहिवाशी राहत आहेत. यातील विंग 'ए' मध्ये करुणा खरात या १४ व्या माळ्यावर कुटुंबासोबत राहतात. त्यांच्यासोबत त्यांच्या भावाची ११ वर्षांची प्रतिभा शिनगारे ही मुलगी रहात होती. ती इमारतीच्या प्रवेशद्वारावर येताच अचानक इमारतीवरून सिमेंटचा ठोकळा तिच्या डोक्यावर पडला. यात ती गंभीर जखमी झाली होती. नातेवाईकांनी तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने डॉक्टरांनी तिला सायन किंवा केईम रुग्णालयात घेऊन जाण्यास नातेवाईकांना सांगितले. मात्र, तिचा मंगळवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हेही वाचा - नवीन वर्षात पुणे - मुंबई रेल्वे वाहतूक होणार सुरक्षीत
दरम्यान, विकासकाच्या निष्काळजीपणामुळे मुलीला जीव गमवावा लागल्याच्या आरोप रहिवाशांनी केला आहे. तसचे विकासकाच्या विरोधात संतप्त होत मृताच्या नातेवाईकांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.