मुंबई - लोकसभा निवडणुकीनिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. निवडणुकीपूर्वी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या सुमारे १५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याची माहिती मुंबई शहर निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दक्षिण मुंबई व दक्षिण मध्य मुंबई या दोन मतदारसंघात तब्बल २१ हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
लोकशाहीत निवडणुका पारदर्शी, नि:पक्षपाती व भयमुक्त वातावरणात होण्यासाठी विविध सरकारी कार्यालये आणि शाळांमधील शिक्षक, महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी नियुक्त केले जातात. कर्मचारी अधिकाऱ्यांना निवडणुकीदरम्यान मतदानाबाबतचे प्रशिक्षण दिले जाते. निवडणुकीचे पहिले प्रशिक्षण नुकतेच झाले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला तब्बल १५०० अधिकारी कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच ज्यांना खरोखर गरज आहे अशा कर्मचारी, अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून सुट दिली जात असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
दोन मतदारसंघात २१ हजार कर्मचारी -
मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत दक्षिण मुंबई व दक्षिण मध्य मुंबई हे दोन लोकसभा मतदारसंघ येतात. या २ लोकसभा मतदारसंघात धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा असे १० विधानसभा मतदारसंघ आहेत. मतदान केंद्रावरील कर्मचारी व अधिकाऱ्यांपासून ते निवडणूक विषयक यंत्रणा हाताळणारे सर्व विभागाचे विविध अधिकारी व कर्मचारी असे सर्व मिळून जवळपास २१ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मतदान केंद्राध्यक्ष ३१६२, प्रथम मतदान अधिकारी ३१६२, इतर मतदान अधिकारी ६३२४, क्षेत्रीय अधिकारी ४५०, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी २६००, शिपाई ४ हजार तसेच या सर्वांना सहकार्य करण्यासाठी १२०० कार्यालयीन कर्मचाऱ्यांची विधानसभा मतदारसंघनिहाय नेमणूक करण्यात आली आहे.