मुंबई Eknath Shinde : राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी उशीरा राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनावर भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी मराठा आरक्षणावर चर्चा केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
एकनाथ शिंदे एकटेच राज्यपालांच्या भेटीला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अचानक राज्यपालांच्या भेटीला आले. मागच्या आठवड्यातही एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला गेले होते. तेथे त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. एकामागोमाग एक होणाऱ्या या भेटींमुळे आता राज्यात विविध चर्चांना उधाण आलंय. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटेच राज्यपालांच्या भेटीला गेले होते. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'सागर' बंगल्यावर भाजपच्या कोअर समितीची बैठक घेतली.
मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक : मंगळवारी (३१ ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. सरकारनं नेमलेल्या न्यायाधीश शिंदे यांच्या समितीनं मराठा आरक्षणाबाबतचा आपला अहवाल सरकारला सादर केला. या समितीला मुदतवाढ मिळाली आहे. मात्र तरी प्राथमिक निष्कर्षाच्या आधारे सरकारकडून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय होणार असल्याची चर्चा आहे.
मराठा आंदोलन पेटलं : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच पेटलाय. आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनानं मराठावाड्यात उग्र रुप धारण केलं. सोमवारी आंदोलकांनी बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार प्रकाश सोलंके यांच्या घराला आग लावली. याशिवाय बीडमधील राष्ट्रवादीचं कार्यालयही जाळण्यात आलं. आंदोलकांनी जालना जिल्ह्यात आरक्षणाच्या मागणीसाठी रेल्वे रोको केला. यामुळे सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती.
हेही वाचा :