मुंबई - लोकसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी घेत मुंबई प्रदेश अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी मागील काही महिन्यांपूर्वी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तो आज शुक्रवारी काँग्रेसच्या केंद्रीय कमिटीने मंजूर केला आहे. त्यामुळे मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची तात्पुरती जबाबदारी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यासाठी आज अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची मुंबई प्रदेशच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.
मागील महिन्यातच एकनाथ गायकवाड यांच्यावर मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता, त्यांच्यावर या पदासोबतच अध्यक्ष पदाचाही कार्यभार सोपवण्यात आल्याने तोंडावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
हेही वाचा - मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा दिला राजीनामा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांना बाजूला सारून मिलिंद देवरा यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे, मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये निरुपम विरुद्ध देवरा अशी मोठी गटबाजी समोर आली होती. आता गायकवाड यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाची धुरा देण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा निरुपम गटामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, त्याचा फटका काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत बसेल अशी असे भाकीत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.