मुंबई : अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल वाहतुकीसाठी बंद ( Gokhale Bridge closed for traffic ) केला आहे. या पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर केले जाणार आहे. यासाठी पालिकेने ८४ कोटींच्या निविदा मागवल्या असल्याची माहिती पालिकेचे पायाभूत सुविधा विभागाचे उपायुक्त उल्हास महाले (Deputy Commissioner Ulhas Mahale ) यांनी दिली.
८४ कोटींच्या निविदा : अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल ७ नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल कोणी पाडवा यावरून पालिका आणि रेल्वे यांच्यात वाद होता. रेल्वेला विविध परवानग्या लागणार असून त्यासाठी तीन महिन्यांहून अधिक काळ लागणार होता. यासाठी हा पूल पालिकेने पाडावा असे रेल्वेचे म्हणणे होते. तर रेल्वेच्या हद्दीतील पूल पाडण्याचा अनुभव नसल्याचे पालिकेचे म्हणणे होते. यावर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक संपन्न झाली. यात पश्चिम रेल्वे प्रशासनाने पूल पाडण्याची तयारी दर्शवली आहे. पश्चिम रेल्वे प्रशासन पूल पाडण्यासाठी निविदा मागवणार असून पुलाचा भाग पाडल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी ८४ कोटींच्या निविदा मागवल्या असल्याची माहिती महाले यांनी दिली.
आयआयटीच्या डिझाईननुसार पुलाचे काम : अंधेरी येथील गोखले पूल पाडल्यानंतर त्या पुलाचे डिझाईन कसे असेल हे आयआयटी ठरवणार आहे. आयआयटीने तयार केलेल्या डिझाईन नुसार हा पूल बांधला जाणार आहे. हे डिझाईन पश्चिम रेल्वे प्रशासनाला ही मान्य आहे असे महाले यांनी सांगितले.