मुंबई - सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या पत्नी स्वप्नाली भोसले यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स मिळाल्याची माहिती समोर येत आहे. स्वप्नाली या विश्वजीत कदम यांच्या पत्नी व पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची कन्या आहेत.
अविनाश भोसले यांची झाली आहे ईडी चौकशी -
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 27 नोव्हेंबर 2020ला ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. 'फेमा' कायद्या अंतर्गत ही चौकशी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. याबरोबर 2019मध्ये अविनाश भोसले यांच्या पुणे व मुंबईतील 23 ठिकाणांवर आयकर विभागाकडून सुद्धा छापेमारी करण्यात आली होती.
महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना मिळाले आहेत समन्स -
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून ईडीकडून राज्यातील महाविकास आघाडीमधील नेते मंडळींना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहेत. यामध्ये शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनाही चौकशीसाठी ईडीकडून समन्स बजावण्यात आलेले होते. यानंतर आता राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांची पत्नी स्वप्नाली यांना सुद्धा ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवल्याची माहिती मिळत आहे.