मुंबई : किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानुसार, ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी महापालिकेच्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडलगत असलेल्या उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्यास मंजुरी मिळवली. आमदार रविंद्र वायकर यांनी या जमिनीवर मातोश्री क्लब उभारला. याच जागेतील क्रीडांगण आणि उद्यानासाठी आरक्षित दोन लाख चौरस फूट जागा ताब्यात घेऊन येथे 'मातोश्री' नावाने पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येत आहे. याकामी वायकरांनी 500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
वायकरांना 25 कोटींचा मोबदला? महाकाली गुंफा कथित 500 कोटी घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. यामुळे आमदार वायकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किरीट सोमय्या यांनी या घोटाळ्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे केली आहे. महाकाली मंदिर गुंफा परिसर आणि आसपासच्या विभागाचे विकासकाम मुंबई महापालिका आणि ठाकरे सरकार यांनी शाहीद बलवा व अविनाश भोसले यांना एकत्रितपणे दिले. या विकास प्रकल्पासाठी 500 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला. त्यापैकी 25 कोटींचा मोबदला हा रवींद्र वायकर यांना मिळाला.
रवींद्र वायकर हाजीर हो! जवळपास 1 लाख चौरस फूट जागा अवघ्या 3 लाख रूपयांमध्ये शाहीद बलवा आणि अविनाश भोसले यांना देण्यात आली. त्यामध्ये झालेला नफा वायकरांना मिळाला असल्याचा आरोप देखील सोमय्यांकडून करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महापालिका आणि मुख्यमंत्री कार्यालय यांनी या व्यवहारांना संपूर्णपणे पाठिंबा दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी आता आर्थिक गुन्हे शाखेकडून रवींद्र वायकर यांची चौकशी सुरू होणार आहे. त्यामुळे महापालिकेचे अधिकारीसुद्धा आर्थिक गुन्हे शाखेच्या रडावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे आरोप? माजी मंत्री, शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांनी मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रिमो बँकवेटच्या नावाने शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी 4 मार्च, 2023 रोजी केला होता. अनेक वर्षे सामान्य नागरिकांसाठी क्रीडांगण राखीव ठेवायचे होते. त्यावर मातोश्री क्लबच्या सुप्रीमो बँक्वेट नावाने रीतसर बँक्वेट हॉल असे उद्योग सुरू आहेत. आता मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील खुले क्रीडांगण, उद्यानासाठी असलेल्या जागेवर वारकऱ्यांनी अनधिकृत कब्जा करून दोन लाख चौरस फुटाच्या पंचतारांकित हॉटेल बांधकामाला सुरुवात केली आहे. या हॉटेलची किंमत 500 कोटी रुपये असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता.