मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (Veermata Jijabai Bhosle Park) आणि प्राणिसंग्रहालयाचे आधुनिकीकरण पूर्ण होवून त्यात एकापाठोपाठ आकर्षणाची भर पडते आहे. राणीबागेत पेंग्विन, वाघ, बिबट्या, अस्वल आदी प्राणी पक्षी बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. सध्या मुलांच्या शाळांना दिवाळीची सुट्टी आहे. शुक्रवार ते सोमवार या चार दिवसांत ४९ हजार ३२१ पर्यटकांनी राणी बागेला भेट दिली आहे. यामुळे राणीबागेला १९ लाख ३१ हजार ८८५ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. बच्चे कंपनी आणि पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र म्हणून राणीबाग (Rani Baug) ओळखली जाते. या राणीबागेत प्राणी, पक्षी पाहायला पर्यटकांची गर्दी होते. आतापर्यत राणीबाग एक प्राणी संग्रहालय म्हणून ओळखली जात होती.
राणीबाग आंतरराष्ट्रीय दर्जाची: काही वर्षांपूर्वी प्राण्यांचा मृत्यू झाल्याने राणीबागे विरोधात टीका झाली होती. त्यानंतर राणीबाग आंतरराष्ट्रीय दर्जाचीकरण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१७ मध्ये पेंग्विन आणण्यात आले. तेव्हापासून पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मागील वर्षी वाघ, बिबट्या, तरस, अस्वल आदी प्राणी आणल्यानंतर राणीबागेत पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यावर सुमारे २ वर्षे राणीबाग बंद होती. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर राणीबाग पुन्हा पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आली.
निसर्गप्रेमी, लहान मुले आणि विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद: पेंग्विन प्रदर्शनी सुरू झाल्यानंतर पर्यटकांची प्राणिसंग्रहालयात रोज मोठी झुंबड उडते आहे. सोबतीला नव्याने दाखल झालेले विविध वन्य पशुपक्षी, प्राणी याठिकाणी पाहायला मिळत असल्याने पर्यटकांसाठी येथील रपेट ही नेहमीच पर्वणी ठरत आली आहे. पर्यटक, निसर्गप्रेमी आणि खास करून लहान मुले आणि विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता महानगरपालिकेने आता राणीबाग आंतरराष्ट्रीय दर्जाचीकरण्याचा निर्णय घेण्यात आला.
१९ लाख ३१ हजार ८८५ रुपये इतका महसूल जमा: सध्या मुलांच्या शाळांना दिवाळीची सुट्टी आहे. सुट्ट्या असल्याने लहान मुलांसह मोठ्यांनी राणी बागेला भेट देणे पसंत केले आहे. शुक्रवारी ३,०४८ पर्यटकांनी भेट दिली. त्यात १,५३,२५० रुपये, शनिवारी ८,५७९ पर्यटकांनी भेट दिली त्यात ३,३१,३१० रुपये, रविवारी १७,४९८ पर्यटकांनी भेट दिली त्यात ६,५५,६७५ तर सोमवारी २०,१९६ पर्यटकांनी भेट दिली त्यात ७,९१,६५० रुपये उत्पन्न मिळाले आहे. शुक्रवार ते सोमवार या चार दिवसांत ५० हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यामध्ये १९ लाख ३१ हजार ८८५ रुपये इतका महसूल जमा झाल्याचे प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.