मुंबई - जगभरात कोरोना विषाणूंचा विळखा पसरत असताना भारतातही याचे रुग्ण आढळून आल्यानंतर या संदर्भात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. राज्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाने नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपयोगी पडणाऱ्या मास्क व हँड सॅनिटायजरची बाजारात मागणी वाढली. याची वाढती मागणी पाहता दुप्पट भावाने बनावट हँड सॅनिटायजर विकले जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाली होती. यावर एफडीएकडून गेल्या ३ दिवसात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
कांदिवली पूर्व येथील गोकुळ मेडिकल स्टोरवर करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान एफडीएने विना परवाना उत्पादित करण्यात आलेल्या 'बायोटॉल व्हिज' या हँडसॅनिटायजरचा ८ हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे. याबरोबरच कांदिवली पूर्वेतील रिद्धी सिद्धी एंटरप्रायजेस, व इतर ठिकाणी छापा टाकून तब्बल २ लाख ८५ हजारांचा बनावट हँडसॅनिटायजरचा साठा जप्त केला आहे.
हेही वाचा - भाजपच्या कर्जमाफीने लोकांची पिवळी होण्याची वेळ आली होती - अजित पवार
यासोबत १२ मार्च रोजी मुंबईतील वाकोला परिसरातील संस्कार आयुर्वेद या ठिकाणी एफडिएच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला असता येथे १ लाख १० हजार रुपयांचा बनावट अँटी बॅक्टेरियल हँड वॉश व हँडसॅनिटायजर जप्त करण्यात आला आहे. हँडसॅनिटायजर विकत घेताना ग्राहकांनी वस्तूवर उत्पादन परवाना आहे की नाही याची खात्री करूनच वस्तू विकत घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
हेही वाचा - 'बोल बच्चन गँग'च्या 2 आरोपींना अटक; संबंधितांवर 150 हून अधिक गुन्हे दाखल