मुंबई - शहरात व ठाण्यात शुक्रवारी रात्री पासून पुन्हा पाऊस पडल्याने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. त्याचा मध्य रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पाऊस पडल्यावर सखल भागातील पाण्याचा निचरा लवकर होत नसल्याने नेहमी प्रमाणेच हिंदमाता, किंगसर्कल, सायन, कुर्ला, अंधेरी आदी विभागात पाणी साचले. तसेच पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस पडत असल्याने दहिसर नदीने धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान वेध शाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत सकाळी 8.30 पर्यंत कुलाबा येथे 53.6 तर सांताक्रूझ येथे 134 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मुंबई महापालिकेच्या पाऊस नोंदणी केंद्रावर आज सकाळी 7 ते 8 या एका तासात भायखळा येथे 9 मिमी, मलबार हिल आणि नायर हॉस्पिटल येथे 8 मिमी, पूर्व उपनगरात मुलुंड गवाणपाडा - 36 मिमी, भांडूप - 31 मिमी, मुलुंड अग्निशमन केंद्र - 20 मिमी, विक्रोळी - 11 मिमी, कुर्ला - 9 मिमी, पश्चिम उपनगरातील दिंडोशी - 50 मिमी, कांदिवली - 41 मिमी, मालाड येथे - मिमी, चिंचोली - 34 मिमी, तर गोरेगाव-दहिसर येथे 33 मिमी पावसाची नोंद झाली.
या ठिकाणी वाहतूक वळवली -
मुंबईत हिंदमाता, सायन, किंग सर्कल, कुर्ला, मालाड साईनाथ सबवे, दहिसर सबवे, मोतीलाल नगर, कांदिवली, पश्चिम द्रुतगती मार्ग आदी भागात पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली.