मुंबई : उन्हामुळे घामांच्या धारांनी हैराण झालेले मुंबईकर खिशाला कात्री लावून आरामदायी प्रवासासाठी एसी लोकलकडे वळू लागले आहेत. परंतु एसी लोकलमध्ये वारंवार होणारा तांत्रिक बिघाड, तिकीट तपासनीस मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने एसी लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांची होणारी गर्दी, या सर्व बाबी पाहता तिकीट/ पास धारक एसी प्रवाशांचे मात्र हाल होताना दिसत आहेत. त्यातच एसी लोकल सेवा व्यवस्थित करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेकडून होत आहे.
एसी प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ : मुंबईत वाढत्या उन्हामुळे पश्चिम तसेच मध्य रेल्वेच्या एसी लोकलला प्रवाशांची प्रचंड मागणी आहे. मागच्या वर्षी सप्टेंबर २०२२ मध्ये एसी लोकलने प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंची संख्या ही ६६ हजार इतकी होती. ऑक्टोबर २०२२ मध्ये हा आकडा ७२ हजारावर गेला. तर नोव्हेंबरमध्ये हा आकडा ८४ हजारावर पोहोचला. मागच्या मार्च महिन्यात पश्चिम रेल्वेवर एसी लोकलमधून दिवसाला ९० हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. एप्रिल महिन्यात ही संख्या १ लाखाच्यावर गेली आहे. मध्य रेल्वेवर सप्टेंबर २०२२ मध्ये दररोज ४६ हजार यात्रेकरूंनी एसी लोकल मधून प्रवास केला आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये ही संख्या ४७ हजार ६०० वर पोहचली आहे. तर एप्रिल महिन्यामध्ये ही संख्या ५५ ते ६० हजार पर्यंत पोहचली आहे.
तांत्रिक बिघाडाने प्रवासी हैराण : आताच्या घडीला पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या दिवसाला ७९ तर मध्य रेल्वेवर ५६ फेऱ्या चालविण्यात येतात. मार्च, एप्रिल, मे या दरम्यान उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात असतो. तसेच हवामान विभागाने यंदा उष्माघाताचा इशारा मोठ्या प्रमाणात दिल्या असल्याकारणाने एसी लोकर वर प्रवाशांचा मोठा भार दिसून येत आहे. परंतु एसी लोकलची दुरुस्ती पाहिजे तशी होत नसल्याने एसी लोकलमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत आहे. एसी लोकलचे दरवाजे बंद न होणे, एसी लोकलमध्ये वातानुकूलित यंत्रणा बंद पडणे या तक्रारी वारंवार होऊ लागल्या आहेत. या कारणास्तव प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. रेल्वे प्रवासी संघटनांनी याबाबत आक्रमक भूमिका घेत रेल्वे प्रशासनाला यावर जातीने लक्ष देण्याची विनंती केली आहे. तशी मागणी रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष, नंदकुमार देशमुख यांनी केली आहे
फुकट्या प्रवाशांची संख्या जास्त : एसी लोकलमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा निर्माण झाला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या गर्दीमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. अशात एसी लोकलमध्ये तिकीट तपासनीसांची संख्या फारच कमी प्रमाणामध्ये आहे. या कारणास्तव अनेकदा दुसऱ्या दर्जाचे प्रवासी, त्याचबरोबर प्रथम श्रेणीचे प्रवासी सुद्धा एसीच्या डब्यामधून सर्रासपणे प्रवास करताना दिसून येत आहेत. या कारणास्तव एसी लोकलचे तिकीट/पासधारक प्रचंड नाराज असून रेल्वे प्रशासनाने यावर लक्ष दिले तर, एसी पास/ तिकीट धारकांना आरामात प्रवास करता येईल, अशी इच्छा ही त्यांनी व्यक्त केली आहे. याच महिन्यात १५ एप्रिल रोजी, वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक (मुंबई विभाग) यांच्या देखरेखीखाली एसी लोकलमध्ये अचानक तिकीट-तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. पश्चिम रेल्वे वरील चर्चगेट ते विरार दरम्यान चार वेगवेगळ्या एसी लोकल सेवेची चेकिंग करण्यात आली. यामध्ये विना तिकीट प्रवासाची ६१ प्रकरणे, उच्च श्रेणीतील प्रवासाची २१ प्रकरणे सापडली. प्रवाशांकडून ३२ हजार ४२५ रुपये दंड वसूल केला. एप्रिल २०२३ या महिन्यात आतापर्यंत एसी लोकलमधील अनियमित प्रवासाची ४ हजारच्यावर प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
परगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी : शाळा, कॉलेज यांना सुट्टी असल्या कारणाने अनेक परिवार सहकुटुंब गावी, पर्यटनस्थळी, परगावी जात आहेत. यासाठी विमानतळावर पोहचण्यासाठी जास्त करून पूर्वी स्वतंत्र वाहन करून रस्ते मार्गाचा वापर केला जात होता. यासाठी उपनगरातून मुंबई विमानतळावर पोहोचण्यासाठी १८०० ते अडीच हजार रुपये इतके गाडी भाडे द्यावे लागत होते. परंतु आता एसी लोकल सुरू झाल्याने हा प्रवास अतिशय आरामदायी कमी खर्चाचा असल्याने नागरिक एसी लोकल ने प्रवास करत आहेत. या कारणास्तव एसी लोकलमध्ये सहकुटुंब परगावी बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सुद्धा वाढली आहे. एसी लोकलमध्ये गर्दी वाढण्याचे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. या सर्व प्रकरणावर रेल्वे अधिकाऱ्यांशी बातचीत केली असता त्यांनी यावर रेल्वे प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात असल्याचे सांगत लवकरच ते दिसून येईल, असे सांगितले आहे.