नवी मुंबई Drug trafficking : नवी मुंबईत अवैधरित्या राहून अमली पदार्थाचा व्यवसाय करणाऱ्या तब्बल 75 परदेशी नागरिकांवर नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे. हे परदेशी नागरिक आफ्रिका, नायजेरिया, केनिया युगांडा येथील आहेत. पासपोर्टची मुदत संपल्यानंतरही भारतात राहिल्याप्रकरणी या परदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नागरिकांचे अमली पदार्थांच्या तस्करीत हात गुंतलेले आहे. त्यांच्याकडून सुमारे 4 कोटी 26 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
- मुदत संपूनही नवी मुंबईत वास्तव्य : नवी मुंबई परिसरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारे परदेशी नागरिक नवी मुंबईत भाड्यानं राहत होते. नवी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी दुपारी वाशी, कोपरखैरणे, खारघर, तळोजा येथून एकाच वेळी सहा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून तब्बल 75 परदेशी नागरिकांची धरपकड केली.
4 कोटी 26 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त : त्यांच्याकडून 4 कोटी 26 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांत नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या अनेक परदेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचे विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
विविध प्रकारचे ड्रग आढळून आले : नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत पोलिसांनी 75 हून अधिक परदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांच्या घराची तसंच कागदपत्रांची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्याकडं विविध प्रकारचे ड्रग आढळून आले. यापैकी काहींकडे पासपोर्ट, व्हिसा नव्हता, तर काहींच्या पासपोर्ट, व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ते इथ राहात होते. या परदेशींकडून 700 ग्रॅम कोकेन, 300 ग्रॅमपेक्षा जास्त एमडी, 300 किलो ट्रामाडॉल हायड्रोक्लोराईड असे ड्रग्ज जप्त करण्यात आले. एकूण 4 कोटी 26 लाख रुपयांचे अंमली पदार्थ असल्याची माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.
हेही वाचा -