मुंबई - राज्यात भेलपुरी-पाणीपुरीसह उघड्यावर पदार्थ विकणाऱ्यांना यापुढे ड्रेस आणि ठराविक प्रकारचे हातमोजे घालणे सक्तीचे केले जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज विधानपरिषदेत दिली. विधानसभेने मंजूर केलेले अन्न सुरक्षा व मानके (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक-२०२० हे आज विधानपरिषदेत संमत करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
राज्यात भेसळखोरांच्या विरोधात आलेल्या तक्रारींवर आयुक्तांनी आठ दिवसाच्या आत कारवाई करण्याची सुधारणा या विधेयकात करण्यात आली असल्याचेही डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. अन्न सुरक्षा व मानके विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधीपक्षाच्या सदस्यांनी भेसळखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यावर, मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, अन्न व औषध प्रशासन हा विभाग राज्यातील जनतेच्या जगण्याशी संबंधित विभाग आहे. त्यामुळे, राज्यातील प्रत्येक नागरिकांना चांगले आणि शुद्ध अन्न मिळाले पाहिजे. या सर्व बाबींचा या विधेयकात विचार करण्यात आला आहे. हे विधेयक मागच्या सरकारचेच आहे. मागील काळातच हे विधेयक सरकारने आणले होते. परंतु, आचारसंहितेमुळे ते थांबले होते, असे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.
भेसळ आणि त्यावरील विषय महत्वाचा असल्याने त्याबाबत विभागावर चर्चा ठेवावी. त्यावर मलाही उत्तर देण्यासाठी समाधान वाटेल, अशी अपेक्षा डॉ. शिंगणे यांनी आपल्या उत्तरादरम्यान व्यक्त केली. तसेच अनेक ठिकाणी कारवाई करण्यासाठी येत असलेल्या अडचणीत प्रामुख्याने आमच्याकडे पदांची संख्या कमी आहे. त्यामुळे, आम्ही नुकतेच १५६० पदांची मागणी केली आहे. मात्र, यापुढे राज्यात भेसळखोरांना आळा घालण्यासाठी आणखी कायदे कडक करण्याची गरज आहे. यामुळेच आम्ही आमच्या विभागासह पोलिसांनाही अधिकचे अधिकार दिले जातील, अशी माहिती डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.
हेही वाचा- सुनेचे विवाहबाह्य संबंध होते, विद्या चव्हाणांचा गौप्यस्फोट