मुंबई - कोरोनामुळे मुंबईतील नालेसफाईच्या कामांना अगोदरच उशीर झाला. महापालिकेने लॉकडाऊनच्या काळातच पावसाळी पूर्व नाल्यांच्या साफसफाईची कामे हाती घेतली होती. मात्र, पावसाळा तोंडावर आला तरी मुंबईतील नाल्यांची साफसफाईची कामे अपूर्ण असल्याचे चित्र आहे. अंधेरी येथील जरीमरी परिसरातील सफेद पूल परिसरातील मिठी नदीचा भाग असलेल्या नाल्याचा आज (मंगळवारी) ईटीव्हीने आढावा घेतला.
मुंबईत कोरोनाचा प्रभाव वाढता असला तरी पावसाळा तोंडावर आल्यामुळे इतर कोणत्याही कामापेक्षा नालेसफाईच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश यापूर्वीच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले होते. परंतु, असे असले तरीही अंधेरी जरीमरी परिसरातील सफेद पूल येथील मिठी नदीचा भाग असलेल्या नाल्याची साफसफाई हाती घेतली नसल्याचे ईटीव्ही भारतने केलेल्या पाहणीत दिसून आले.
याबाबात स्थानिक नगरसेवक वाजीद कुरेशी यांनी देखील पालिकेने अद्याप या परिसरात नाल्याच्या साफसफाईला सुरुवात केली नसल्याने चिंता व्यक्त केली आहे. मुंबईवर घोघावणाऱ्या निसर्ग चक्रीवादळातही मोठ्या प्रमाणात पाण्याच्या प्रवाहाने गाळ नाल्यात वाहून येवून पावसात नाल्यातील पाणी बाहेर येऊन परिसरातील झोपडपट्टी भागात शिरेल, अशी भीती नगरसेवक वाजीद कुरेशी यांनी व्यक्त केली आहे.