मुंबई : सदिच्छा साने 22 ही वांद्रे बँड स्टँड येथून बेपत्ता झाल्यानंतर अंगरक्षक मिठू सिंग (32) याला गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने अटक केली. सदिच्छा अखेरची त्याच्यासोबत असल्याचे समोर आले. दक्षिण मुंबई येथील जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये सदिच्छा साने ही तिसऱ्या वर्षाला शिकत होती. २९ नोव्हेंबर २०२१ ला ती परीक्षेसाठी जाते म्हणून घरातून निघाली पण ती परतलीच नाही. सदिच्छाचा शोध कुठेच लागत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर जे. जे. मार्ग पोलिसांनी देखील तिचा शोध घेतला. तिचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविेण्यात आला होता. तांत्रिक पुराव्यांवरून तिचे शेवटचे लोकेशन वांद्रे बँड स्टॅन्ड येत होते. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी वांद्रे पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती.
१०० पेक्षा अधिक जणांची चौकशी : गुन्हे शाखेचा कक्ष ९ ने याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करतानाच पोलिसांनी १०० पेक्षा अधिक जणांची चौकशी देखील केली. सदिच्छाला शेवटचे अंगरक्षक मिठू सिंगने पाहिले होते. तिने याच्यासोबत सेल्फी देखील काढली होती. पोलिसांनी मिठू सिंगची चौकशी केली; मात्र तो चौकशीत सहकार्य करत नसल्याने पोलिसांना न्यायालयात त्याच्या नार्को चाचणीसाठी अर्ज केला होता. पोलिसांनी मिठू विरोधात पुरावे गोळा केले. परिस्थितीजन्य पुराव्यांवरून त्याला अटक करण्यात आली. चौकशीमध्ये मिथ्थु याच्यासोबत सदिच्छा असताना त्याने अब्दुलशी संपर्क केला आणि दोघांमध्ये फोनवरून चर्चा झाली. यामध्ये दोघेही सदिच्छा हिच्याबाबत आक्षेपार्ह आणि अश्लील बोलत असल्याचे तपासातून समोर आल्यानंतर पोलिसांनी शनिवारी अब्दुलला अटक केली.
21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी : सदिच्छा बेपत्ता प्रकरणात गुन्हे शाखेने जब्बारची चौकशी केली होती; मात्र त्याची भूमिका नेमकी काय आहे याबाबत गुप्तता बाळगली जात आहे. सदिच्छाचे वडील मनीष साने यांच्या विनंतीनंतर या प्रकरणाचा नव्याने तपास करण्यात येणार आहे. सिंगला न्यायालयात हजर केले असता त्याला 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदिच्छाचा शोध घेण्याच्या संदर्भात गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्येही भेट दिल्याचे सूत्रांची माहिती आहे. सदिच्छाचे अपहरण खंडणीसाठी करण्यात आल्या असल्याचा आरोप सिंगवर ठेवण्यात आला होता. मात्र, याप्रकरणी आम्हाला खंडणीसाठी कोणताही फोन आलेला नसल्याचे तिचा भाऊ संस्कार याने सांगितले आहे.
फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट : डाॅ साने अपहरणाच्यातपासात पोलिसांना अटक करण्यात आलेल्या मिठू सिंग याने साने यांना ती गायब झाल्याच्या दिवशी सकाळी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचे समोर आले आहे. 29 नोव्हेबर 2021 रोजी पहाटे 4 च्या सुमारास सिंग याने ही रिक्वेस्ट पाठवली होती. या संदर्भातील तपासासाठी पोलिस सायबर पोलिसांची मदत घेत आहेत.
नेमके हे प्रकरण काय ? : सदिच्छा 29 नोव्हेंबर 2021 रोजी विरार स्टेशनवरून सकाळी ९. ५८ वाजता ट्रेनमध्ये चढली आणि अंधेरीला उतरली. तिला जे. जे. हॉस्पिटलमध्ये दुपारी दोन वाजता प्रीलीमसाठी हजर व्हायचे होते. ती दुसऱ्या ट्रेनमध्ये चढली आणि वांद्रे येथे उतरली. तेथून ती बँडस्टॅन्डला ऑटो घेऊन गेली. ती आत्महत्या करेल या भीतीने पहाटे साडेतीनपर्यंत गप्पा मारल्याचा सिंगने दावा केला आहे.
हेही वाचा : Auranbabad Crime सहायक पोलीस आयुक्तांनी मित्राच्या पत्नीची काढली छेड, तक्रारीनंतर गुन्हा दाखल