मुंबई - येथील नायर रुग्णालामधील स्त्रीरोग विभागात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवी या 26 वर्षीय डॉक्टरच्या आत्महत्येचे प्रकरण दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. डॉ. पायल हिने बुधवारी आपल्या वरिष्ठांकडून होणाऱ्या रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. तडवी यांच्या आत्महत्येचे प्रकरण आता संवेदनशील झाले असून यातील दोषींवर कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन केली आहे.
त्याबरोबरच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी रॅगिंग विषयी बैठक घेऊन सर्व कॉलेजमधील रॅगिंग समित्याबाबत आढावा घेण्याची सूचना गोऱ्हे यांनी यावेळी केली. विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे देखील आगामी अधिवेशनात याविषयावर चर्चा करून, अशा घटना भविष्यात घडू नये, यासाठी अस्तित्वात असलेल्या समितीची पुनर्रचना व नियमावली करण्याची त्यांनी विनंती केली.
या निवेदनात भविष्यात रॅगिंगच्या घटना घडू नयेत यासाठी प्रत्येक कॉलेज व हॉस्पिटलच्या आवारात तक्रारपेटी लावण्यात यावी, एखाद्या सिनियर विद्यार्थी किंवा वरिष्ठ डॉक्टरने त्रास दिला तर या तक्रारपेटी तक्रार नोंदविण्याची सूचना देण्यात यावी. ही पेटी हॉस्पिटलचे अधिष्ठाता व त्या विभागाचे पोलीस अधिकारी यांच्या समोरच ही पेटी उघडण्यात यावी, अशी विनंती या निवेदनात केली आहे.
विद्यालयीन अँटी रॅगिंग समित्याचा आढावा घेऊन नविन विद्यार्थ्यांना अँटी रँगिंग दक्षता सूचनांची सेवा व मदत प्राप्त करुन देणारी सेवा प्रत्येक विद्यापीठांनी तत्काळ देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच डॉ.पायलचा फोन व व्हाट्सअपचा तपास करण्यात यावा, त्यानुसार दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याऱ्या आणि कॉलेजमधील सिनियर विद्यार्थ्यांना रॅगिंगच्या दुष्परिणामाबाबत समुपदेशन करण्यात यावे, अशी मागणीही गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्याकडे केलेल्या निवेदनात केली आहे.