मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या जामीन अर्जाची शुक्रवारी सुनावणी झाली. सुनावणीत राज्य सरकारकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून युक्तिवाद करताना म्हटले की, या प्रकरणाचा तपास अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यात असल्याने सद्य परिस्थितीत आरोपींना जामीन देणे योग्य ठरणार नाही. तर अटक करण्यात आलेले आरोपी महिला असून या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हायला हवा असे बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले आहे.
बचाव पक्षाच्या वकिलांच्या या युक्तीवादावर सरकारी वकील राजा ठाकरे यांनी देखील प्रतिव्यूत्तर दिले. सरकारी वकील म्हणाले की, आरोपी जरी महिला डॉक्टर असल्या आणि त्यांचे करीयर पणाला लागले असले तरी दुसरीकडे आत्महत्या करणारी देखील महिला डॉक्टर होती. तिनेही आपला जीव गमावला आहे, हे विसरून चालणार नाही. अजामीनपात्र गुन्ह्यात आरोपी आपल्या मूलभूत अधिकारांविषयी बोलू शकत नाहीत. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करून पुढील सुनावणी सोमवारी ठेवली आहे.