मुंबई : मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवर या संसर्गजन्य आजाराची ( Measles Patients in mumbai ) साथ पसरली आहे. या कालावधीत ३ हजाराहून अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहेत. लहान मुलांपासून तरुणांनाही गोवर झाल्याचे समोर आले आहे. गोवरमुळे ९ मुलांचा मृत्यु झाला आहे. गोवरचा धोका लहान मुलांना अधिक असून ८० वर्षावरील वयोवृद्धांनाही गोवरचा धोका आहे. या वयोगटातील नागरिकांना गोवरची लागण होऊ नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. तरुणांना गोवरचा धोका ( Measles Patients) अधिक नसल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
मुंबईत गोवरचा प्रसार, ९ मृत्यू - मुंबईमध्ये शनिवार १९ नोव्हेंबरपर्यंत २६ लाख २७ हजार ६६७ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ३०३६ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे १८४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७३ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. ६२ रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. ९ रुग्ण ऑक्सिजनवर तर २ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात १५ हजार ००९ मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे. २६ ऑक्टोबर पासून मुंबईत ९ मृत्यू झाले आहेत. त्यामधील एक मृत्यू मुंबई मुंबई बाहेरील (भिवंडी) येथील आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. .
या कारणामुळे लसीकरणाकडे दुर्लक्ष - मुंबईमध्ये गेल्या काही दिवसात गोवर रुग्णांची आणि मृत्यूची संख्या वाढत आहे. या संदर्भात राज्य सरकारच्या जे जे रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना, गोवरचे लसीकरण कोविडच्या काळात कमी पडले आहे. लहान मुलांना जन्मानंतर एक ते दिड महिन्यात पोलिओ आणि इतर लसी दिल्या जातात. मुलं लहान असताना त्याच्या आईलाही काहीना काही कारणाने हॉस्पिटलमध्ये यावे लागते. यामुळे त्यावेळी लसीकरण करून घेतले जाते. त्यानंतर बाळ ९ महिन्याचे झाल्यावर गोवरची लास दिली जाते. मात्र हे प्रमाण इत्तर लसीकरणापेक्षा कमी झालेले असते. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात गोवरची लस द्यायची अशी मोहीम शासनाने २०१८ मध्ये राबवली होती. कोविडमध्ये नागरिकांना घराबाहेर जाऊ नका, आपल्या लहान मुलांना कोविड पासून वाचवा, असे आवाहन केले जात होते. कोरोना नियम शिथिल झाल्यावर पालक आपल्या कामाच्या व्यापामुळे लसीकरण घेऊ शकले नसतील. गोवंडी येथे एकाच घरात दोन मृत्यू झालेल्या महिलेला १० मुले आहेत. त्यांच्या लसीकरणाची तारीख तीला लक्षात ठेवणे शक्यही झाले नसेल असे डॉ. सापळे यांनी सांगितले.
प्रौढांना गोवरचा धोका कमी - मुंबईत गोवरची लस मिळाली नाहीत अशी २० हजार मुले असल्याचे समोर आले आहे. गोवरचा आजार अचानक आलेला नाही. दरवर्षी गोवरचे रुग्ण आढळून येतात. मात्र त्यांची संख्या कमी होती. यंदा लसीकरण न झाल्याने तसेच गोवर प्रकर्षाने आल्याने गोवरचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. प्रतिकार शक्ती कमी असते त्या मुलांमध्ये याचा परिणाम अधिक जाणवतो. त्यांना व्हेंटिलेटरची गरज पडते प्रसंगी मृत्यूही होतो. प्रौढांमध्ये गोवरचे प्रमाण आणि धोका कमी असतो. दरवर्षी जे गोवरचे रुग्ण समोर येतात त्यामुळे प्रौढांना तो बूस्टर डोस मिळत असतो. ज्या तरुणांना गोवरची लागण झाली आहे, त्यांनी लहान असताना लस घेतली होती का हे पाहणे गरजेचे असल्याचे डॉ. सापळे म्हणाल्या.
वयोवृद्धांना अधिक धोका - सुपर सिनियर सिटीझनमध्ये म्हणजेच ८० वर्षावरील वायोवुद्धांचा एक ग्रुप आहे. त्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी असते. त्यांच्यावेळी गोवरची लस उपलब्ध नव्हती. १९६० च्या दशकात गोवरची लस आली. घरातील लहान मुलांना गोवर आले असल्यास त्यांच्या संपर्कात आल्यास या वयोगटातील नागरिकांना गोवरची लागण होऊ शकते. अशा नागरिकांना इतर आजार असल्यास धोकादायक ठरू शकते. या वयाच्या नागरीकांमध्ये गोवरचा प्रसार होऊ नये यासाठी काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉ. सापळे यांनी सांगितले.
लसीकरण आणि जनजागृतीवर भर - मुंबईत ० ते २ वयोगटातील पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले आहे. यात २० हजार मुलांचे लसीकरण राहिले आहे. काहींनी एकच डोस घेतला आहे. तर काहींनी लसिकरणच केलेले नाही. त्यामुळे अशा २० हजार मुलांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले जाणार असून या सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी लस घ्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. गोवंडी, चेंबूर, भायखळा, कुर्ला, मालाड, धारावी, सांताक्रूझ, वडाळा या ८ विभागात गोवरचे रुग्ण सर्वाधिक आहेत. यामुळे या विभागात जनजागृती केली जात आहे. धर्म गुरू, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्फत लसीकरणबाबत जनजागृती केली जात आहे. गरज पडल्यास बेड आयसीयु आणि व्हेंटिलेटरची संख्या वाढवली जाणार आहे.