मुंबई - शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांचीच निवड करण्यात आली आहे. आज नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या मॅरेथॉन बैठकीत जब्बार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची नियामक मंडळाची आजची बैठक वादळी ठरण्याची शक्यता होती. कारण कार्यकारिणी समितीने 24 नोव्हेंबरला 100 व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची निवड केल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या परवानगीशिवाय आणि मोहन जोशींनी माघार घेतलेली नसताना परस्पर पटेल यांच नाव जाहीर केल्याने काही सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. मात्र, नाट्य परिषदेच्या घटनेनुसार कार्यकारणी समितीने अध्यक्षाचे नाव सर्वानुमते निश्चित केल्यानंतर ते नियामक मंडळाला सांगून मग घोषणा करावी, अशी तरतूद आहे. त्यामुळे नियामक मंडळाच्या संमतीचा प्रश्नच येत नसल्याची भूमिका नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी मांडली. त्यानंतर मात्र सर्वानुमते डॉ. जब्बार पटेल यांचीच अध्यक्षपदी निवड केल्याची पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आले.
हेही वाचा - करिनाने घेतली 'सासू'ची मुलाखत, तैमूरबद्दल काय म्हणाल्या माहितेय का?
डॉ. जब्बार पटेल यांचे नाव जाहीर झाल्यामुळे मोहन जोशी आणि त्यांच्यात निवडणूक होणं अटळ असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. तसेच डॉ. जब्बार पटेल यांच्या रूपाने एक सच्चा रंगकर्मी नाट्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदी निवडला गेला आहे.
हेही वाचा - Exclusive Interview: 'मुन्ना बदनाम' गाण्यासाठी वरीना हुसैनने 'अशी' केली तयारी