मुंबई : जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत राज्य सरकारने आज राज्य गीत म्हणून स्वीकारले आहे. यासंदर्भात समाजवादी पार्टीचे आमदार अबू आजमी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणतेही गीत राज्य गीत म्हणून स्वीकारा मात्र, राज्यातील तरुणांना नोकऱ्या, गरिबांवरील अन्याय या संदर्भात राज्य सरकार काय करीत आहे? असा सवाल त्यानी विचारला. त्याबाबत आधी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता करावी, तसेच राज्य सरकारने तरुणांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यायला पाहिजे असे, मतही आजमी यांनी व्यक्त केले.
लव जिहाद हा केवळ कांगावा : भारतामध्ये आपण सर्व लोकशाही मानतो. लोकशाहीमध्ये अठरा वर्षांवरील प्रत्येक सज्ञान व्यक्तीला आपल्या आयुष्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे लव जिहाद झाल्याचा कांगावा कोणीही करू नये. हिंदू तरुण मुस्लिम तरुणीशी जेव्हा विवाह करतात तेव्हा लव्ह जिहाद होत नाही का? विनाकारण लव जिहाद होत असल्याचा सांगावा करून एका विशिष्ट धर्मावर अन्याय करू नका. याबाबत मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे. त्यांनी केवळ एखादा कायदा करण्यासाठी अशा पद्धतीची वातावरण निर्मिती करू नये असेही यावेळी अबू आझमी म्हणाले.
धर्मांतर विरोधी कायदा : लव्ह जिहादच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने दादर शिवाजी पार्क ते कामगार मैदानापर्यंत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी हजारो मोर्चेकरी रस्त्यावर उतरले होते. भाजप नेते आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, किरीट सोमय्या, चित्रा वाघ, आमदार नितेश राणे, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रसाद लाड, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, केशव उपाध्ये, खासदार गोपाळ शेट्टी, वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह शेकडो भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर, किरण पावसकर, शितल म्हात्रे यासह मोठ्या संख्येने महिला देखील मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
लव्ह जिहादच्या विरोधात मोर्चा : देशासह राज्यातील लव्ह जिहादच्या विरोधातील हा मोर्चा आहे. विधान परिषद, विधानसभेत लव्ह जिहादच्या कायद्यासह हिंदू राष्ट्र व्हावे अशी मागणी मोर्चावाल्यांनी केली होती. महिलांच्या हिताचा हा मोर्चा आहे, असल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटले होते. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडले असून केवळ एमआयएमसोबत युती करण्याचे बाकी आहेत, अशी टीका लाड यांनी केली होती. शिवसेनेने हिंदुत्ववादाच्या विरोधात जाऊन राजकारण केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंवर त्यांना केला होता.
लव्ह जिहादला विरोध : शिवसेना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब यांच्या विचाराने चालणारी संघटना आहे. आम्हाला त्याचा गर्व आहे. त्यामुळे लव्ह जिहादला आमचा विरोध आहे. उद्धव ठाकरेंनी कधीच हिंदुत्व सोडले आहे. भाषणात हिंदुत्वावर बोलतात तर, दुसरीकडे राहूल गांधी सोबत फिरतात असा टोला देखील ठाकरेंना लगावला होता. वडीलांचे नाव हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब असताना ठाकरेंनी हिंदुत्व कधीच सोडले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचा वसा उचलला आहे. आजचा जनआक्रोश मोर्चा बाळासाहेबांचे विचाराचे बीज आहे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राम मंदिरासहित अनेक प्रश्नांसाठी बाळासाहेबांनी आपले आयुष्य वेचले. परंतु, बाळासाहेबांचा मुलगा, नातू हा वसा चालवत नाहीत. हे, महाराष्ट्राचे दुदैव आहे, असा टोला किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला होता.
बाळासाहेबांच्या नावाने राजकारण : शिवसेना भवन येथून जाताना, वाईट वाटत आहे. ज्या बाळासाहेबांनी गर्व से कहो हम हिंदू है, असा नारा दिला होता. त्या बाळासाहेबांच्या नावाने राजकारण करत आहेत. त्या पक्षाचा एक ही व्यक्ती या आंदोलनात सामील नाही. जे खरे हिंदू आहेत त्यांनी मोर्चात सहभागी व्हायला हवे होते. हा कोणताही राजकीय मोर्चा नाही. हिंदूत्वाचा मोर्चा आहे. लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद विरोधात कायदा करण्यासाठी आक्रोश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी हा मोर्चा आहे, असे शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी म्हटले होते. उद्धव ठाकरेंवर देखील त्यांनी यावेळी टीका केली होती. इतर समाज, जातीय मते मिळणार नाहीत, या भीतीने ठाकरे या मोर्चात सामील झाले नसल्याचा खोचक टोला त्यांनी ठाकरेंना लगावला होता.