मुंबई- मुंबईतील खासगी क्लिनिक, दवाखाने तत्काळ उघडा, असे वारंवार आदेश राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका देत आहे. मात्र, त्यानंतरही अनेक खासगी डॉक्टर पालिकेकडून पीपीई किट मिळत नसल्याचे सांगत क्लिनिक-दवाखान्याचे शटर बंदच करुन घरी बसले आहेत. अशा डॉक्टरांना अखेर पालिकेने आता चांगलेच सुनावले आहे. आधी क्लिनिक उघडा, काही मिनिटातच 7 दिवसाचे पीपीई किट देऊ, असे आव्हानच आता पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी या डॉक्टरांना दिले आहे.
कोरोनाचे केंद्र आता पूर्व उपनगरांकडे हलले आहे. त्यातही अंधेरी पूर्व, सहार, जोगेश्वरी पूर्व या परिसरात कोरोनाला आळा घालण्याचे आव्हान पालिकेसमोर निर्माण झाले आहे. अशावेळी धारावीप्रमाणे पूर्व उपनगरात क्लिनिकद्वारे स्क्रिनिंग झाले तर संशयित रुग्ण शोधणे सोपे होईल. तसेच नॉन कोविड रुग्णांचीही सोय होईल, असे म्हणत खासगी डॉक्टरांना क्लिनिक-दवाखाने उघडण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. मात्र, त्यानंतरही पूर्व उपनगरातील मोठ्या संख्येने क्लिनिक-दवाखाने अनलॉकनंतरही बंद आहेत.
पालिकेने खासगी डॉक्टरांना पीपीई किट देण्याचे जाहीर केले. पण, अद्याप पीपीई किट मिळत नसल्याचे म्हणत काही जण क्लिनिक बंद ठेवत आहेत. पण मुळात जे क्लिनिक सुरू आहेत त्यांना प्रत्येक 7 दिवसांनी नियमित पीपीइ किट मिळत असल्याची माहिती अंधेरी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ललित चुराडीया यांनी दिली आहे. क्लिनिक उघडे असेल तर पालिकेचे अधिकारी त्याची नोंद करत तत्काळ पीपीई किट देत आहेत. पण क्लिनिक बंदच असेल तर पीपीई किट कसा मिळणार असा सवालही त्यांनी केला आहे. तर के पूर्वचे वॉर्ड ऑफिसर प्रशांत सपकाळे यांनीही जे क्लिनिक उघडी आहेत, तिथे तत्काळ पीपीई किट, स्क्रिनिंगसाठीचे सर्व साहित्य पालिका पुरवत असल्याचे सांगितले आहे.
मात्र यानंतरही पीपीई किट मिळत नसल्याचा आरोप होत आहे. यावर काकाणी यांनी ज्या डॉक्टरचे क्लिनिक बंद आहे त्यांना पीपीई कसे देणार? या डॉक्टरांनी समोर यावे, क्लिनिक उघडावे, आम्ही लगेचच 7 दिवसाचे पीपीई किट देऊ. पीपीई किटचा मुबलक साठा आमच्याकडे आहे, असे सांगितले.