मुंबई - जगभर कोरोनाची भीती असताना आता अमेरिकेत चिमुरड्यांना कावासाकी विषाणूने घेरण्यास सुरुवात केली आहे. 2 ते 15 वयोगटातील मुले या आजाराच्या विळख्यात येत आहेत. मात्र, भारतात अजूनही या असा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे यासंबंधीच्या वृत्ताने भारतातील पालकांना घाबरण्याची काहीही गरज नाही. फक्त मुलांची काळजी घ्या, असे आवाहन जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सपाळे यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेसह अन्य काही देशात कावासाकी विषाणूची लागण सुरू झाली आहे. लहान मुलांमध्ये त्वचेचा रंग बदलणे, उलटी-अतिसार, श्वास घेण्यात अडचणी, छातीत दुखणे अशी लक्षणे दिसतात. कावासाकी विषाणू थेट शरीरात प्रवेश करत हृदयाच्या स्नायूवर हल्ला करतात. स्नायूला सूज येते. त्यानंतर रुग्ण गंभीर होतो आणि त्याला आयसीयूमध्ये दाखल करावे लागते. यात चिमुरड्याचा जीवही जात आहे. अशा या जीवघेण्या आजारामुळे भारतात देखील आता भीतीचे वातावरण आहे. मात्र, भारतात अजून तरी असे रुग्ण आढळलेले नाही, असे डॉ. सपाळे म्हणाल्या.
कावासाकी हा विषाणू नवीन नाही. हा खूप जुना अगदी 50-60 वर्षांपासूनचा जापनीज विषाणू आहे. दरवर्षी याचे दोन-तीन रुग्ण सापडतात. फक्त निदान वेळेत झाले, उपचार वेळेत झाले तर रुग्ण बरा होतो. सध्या कोरोनाच्या काळात हा विषाणू आला आहे. आम्ही कोरोनाबाधित 1 ते 15 वयोगटातील रुग्णांवर विशेष लक्ष देत आहोत. अजून तरी भारतात असा एक ही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे घाबरू नका, पण लहान मुलांची योग्य ती काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले.