मुंबई - कोरोना रुग्णावर रहेजा रुग्णालयात शस्त्रक्रिया करणारे मुंबईतील सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक आणि तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांना कोरोनाची लागण झाली. ते रहेजा रुग्णालयात उपचारासाठी गेले असता त्यांना दहा तास बेड उपलब्ध झाला नाही. अखेर उपचार सुरू असतानाच कोरोनामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी सुजाता आणि मुलगी श्रद्धा असा परिवार आहे.
डॉक्टर चित्तरंजन भावे हे कान-नाक-घसा तज्ञ होते. रहेजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी एका अत्यावस्थ असलेल्या करोना रुग्णावर तातडीची शस्त्रक्रिया केली होती. यानंतर डॉक्टर भावे करोना पॉझिटिव्ह आढळून आले. कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ते ज्या रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करत होते. त्याच रहेजा रुग्णालयात ते स्वतःवर उपचार करून घेण्यासाठी गेले होते. रुग्णालयात जाताना त्यांनी स्वत: गाडी चालवली होती. परंतू त्यांना बेड मिळवण्यासाठी 10 तास ताटकळत रहावे लागले होते. ते पॉझिटिव्ह आल्याने त्यांची मुलगी आणि पत्नीला क्वारंटाइन व्हावे लागले. डॉक्टर भावे यांच्या मृत्यूने मुंबईतील डॉक्टरांनी शोक व्यक्त केला आहे.
मुंबई महापालिकेच्या सेवेतील सुमारे 125 ते 150 तर डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेचे सदस्य असलेल्या 162 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात काम करणाऱ्या 200 हून अधिक नर्स कोरोनाने बाधित झाल्या आहेत. मुंबईत या आधी सैफी हॉस्पिटलमधील एका 82 वर्षांच्या डॉक्टरचा मृत्यू झाला आहे.