मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या चौकशीच्या प्रकरणावरून मुंबई पोलीस दलातील एपीआय सचिन वाझे यांची काल एनआयएकडून 13 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत एनआयएला समाधानकारक उत्तरे न भेटल्याने काल रात्री सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली. या प्रकरणावरून पुन्हा एकदा राज्यातील विरोधी पक्षातील नेते हे सत्ताधाऱ्यांवर आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात बोलताना भाजपनेते राम कदम यांनी सचिन वझे यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
वाझेंची नार्को टेस्ट करा -
सचिन वाझे यांना शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकार पाठीशी का घालत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सचिन वाझे यांची अटक करावी, ही मागणी केली. पण त्यावरूनही सत्ताधाऱ्यांनी राजकारण केले. पण शेवटी एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली. त्यामुळे सत्ताधारी लोकांचा खरा चेहरा यानिमित्ताने बाहेर पडला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करत आहे, अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिली.