मुंबई - फाटक्यांशिवाय दिवाळी, अशी कल्पना कुणी याआधी केली देखील नसेल. पण यंदा मात्र मोठ्या संख्येने नागरिकांनी जाणीवपूर्वक आणि कोरोना संकटाचे भान राखत तसेच मुंबई महानगर पालिकेच्या फटाकेबंदीच्या आदेशाचे पालन करत फटाक्यांना 'फाटा' देत दिवाळी साजरी केली. तर काहींनी नियमांच्या मर्यादा राखत कमी आवजाचे फटाके वाजवले. परिणामी यंदा मुंबईत ध्वनीप्रदूषण गेल्या काही वर्षांच्या तुलनेत खूपच कमी दिसल्याची माहिती आवाज फाऊंडेशनच्या प्रमुख सुमेरा अब्दुलाली यांनी दिली आहे. काल (शनिवार), लक्ष्मी पूजनच्या दिवशी मुंबईत सरासरी 105 डेसिबल आवाजाची पातळी नोंदवली गेली आहे. ही पातळी मागील काही वर्षांच्या तुलनेत कमी असून यासाठी मुंबईकरांचे नक्कीच कौतुक करायला हवे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यानिमित्ताने दिली आहे.
सविस्तर वाचा - मुंबईत यंदाच्या दिवाळीत ध्वनी प्रदूषणाचा स्तर घटला
ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सामाजिक भान ठेवून पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला ठाणेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यंदा ठाणेकरांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यावर भर दिला.पालिका प्रशासनाने ध्वनिप्रदूषणविरहित, फटाकेमुक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करण्यासाठी केलेल्या आवाहनाला ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्यावतीने दिवाळीपूर्व व दिवाळी कालावधीत हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. त्यानुसार ७ नोव्हेंबर रोजी दिवाळीपूर्व कालावधीत २४ तासांकरिता हवेतील धुलिकणांचे प्रमाण १२६ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर इतके होते. नायट्रोजन ॲाक्सिजनचे प्रमाण ३४ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर तर, सल्फरडाय ॲाक्साईडचे प्रमाण २४ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर इतके आढळले होते. त्याचप्रमाणे ध्वनीची अधिकतम तीव्रता ६९ डेसिबल इतकी नोंदविण्यात आली होती.
सविस्तर वाचा - ठाणेकरांची पर्यावरणपूरक दिवाळी
नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाके न वाजण्याच्या शासनाच्या आदेशाला नाशिककरांनी चांगला प्रतिसाद देत यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त दिवाळी म्हणून साजरी केली. मागील वर्षीपेक्षा यंदा 192 टन कचरा घटला असल्याचे नाशिक महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे. नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी हिवाळ्यात दुसरी लाट येऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. दिवाळीत वाजवण्यात येणाऱ्या फटाक्यांच्या प्रदूषणामुळे यात भर पडू शकते, असे आरोग्य विभागाला वाटत असल्याने यंदाच्या दिवाळीत फटाके वाजवू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिककरांनी कमी प्रमाणात आणि प्रदूषण होणार नाही, असे फटाके वाजून दिवाळीचा आनंद साजरा केला.
सविस्तर वाचा - नाशिककरांनी साजरी केली प्रदूषणमुक्त दिवाळी
नागपूर - हॉक रायडर सायकलिंग ग्रुपकडून नागपूरात आगळी-वेगळी आणि पर्यावरणपूरक अशी दिवाळी साजरी करण्यात आली आहे. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश देण्यासाठी सर्व रायडरने आपल्या सायकलच्या चाकांना एलईडी लायटिंग लावली होती. त्यानंतर सर्व सायकल रायडर्सनी संपूर्ण शहरभर फिरून जनजागृती केली. त्यांच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती समन्वयक अजय बनसोडे यांनी दिली.
सविस्तर वाचा - हॉक रायडर सायकलिंग ग्रुपची इको फ्रेंडली दिवाळी साजरी; नागपूरकरांनी केले स्वागत
पंढरपूर -श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने दीपावली आणि लक्ष्मीपूजनानिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा गाभारा या आकर्षक फुलांच्या सजवटीने खुलून दिसत आहे. श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात लाल व पिवळ्या जरबेरा फुलाची सुंदर व मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी असणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दीपावली, लक्ष्मीपूजन निमित्त लाल व पिवळ्या जरबेरा फुलांनी संपूर्ण मंदिर आकर्षक सजवले आहे. देवाचा गाभारा, सोळाखांबी मंडप, चौखांबी मंडप या फुलांमुळे सुंदर व मनमोहक दिसत आहेत.
सविस्तर वाचा - दिवाळीनिमित्त सजली पंढरी; विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या मंदिरात लाल व पिवळ्या फुलांची आरास
मुंबई - 'दिवाळी सण मोठा, आनंदाला नाही तोटा' असं म्हणतात. पण आज अनेक घरातील हा आनंद कोरोनाने हिरावून घेतला. कोरोनाची शिकार झालेल्या कुटुंबात आज प्रकाशाच्या सणाच्या दिवशी अंधार पाहायला मिळत आहे. तर ज्या घरातील सदस्य आज कोरोनाग्रस्त झाल्याने कोविड हॉस्पिटलमध्ये वा सेंटरमध्ये उपचार घेत आहेत, त्या घरातही दिवाळी बहुधा साजरी झाली नसावी. त्यातही दिवाळीसारख्या सणात कोरोनाची शिकार होऊन जीवाभावाच्या माणसापासून दूर रहावं लागत असल्याची खंत अनेक रुग्णांना आज नक्की असेल. या पार्श्वभूमीवर बीकेसी कोविड सेंटरमधील रुग्ण मात्र याला अपवाद ठरली आहेत. कारण घरापासून दूर असतानाही कोरोनासारख्या आजारावर उपचार घेत असतानाही या रुग्णांनी दिवाळी दणक्यात साजरी केली आहे. कारण मोठ्या उत्साहात शनिवारी बीकेसी कोविड सेंटरमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. अगदी रांगोळीपासून फराळ-मिठाई सगळं काही गोष्टींचा आंनद घराप्रमाणे या रुग्णांनी लुटला.
सविस्तर वाचा - बीकेसी कोविड सेंटरमध्येही दिवाळी दणक्यात साजरी.. रुग्णांनी रांगोळीपासून फराळ-मिठाईचा लुटला आनंद
गडचिरोली - नक्षलवादाविरोधात लढणाऱ्या गडचिरोली पोलिसांसोबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सपत्नीक दिवाळी साजरी केली. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम पातागुडमला भागाला दिवाळीनिमित्त भेट देत गृहमंत्री देशमुख यांनी पोलीस जवानांचा उत्साह वाढविला.
सविस्तर वाचा - गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलिसांनी साजरी केली दिवाळी
नांदेड - लक्ष्मीच्या सोनपावलांच्या चैतन्यमयी वातावरणात नांदेड जिल्ह्यात शनिवारी लक्ष्मीपूजनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. प्रकाशाची उधळण करीत आलेला हा सण फटाक्यांच्या आतिषबाजीने साजरा केला. संसर्गाच्या भीतीमुळे घरात बसलेले नागरिक दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे दीपमाळांची रोषणाई, पणत्यांचा झगमगाट, दारासमोरच्या रांगोळ्यांनी वातावरण मंगलदायी बनले होते. यावेळी नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आमावस्येच्या रात्री शहराचा सर्व भाग आसंमतात प्रकाशात न्हाऊन निघाला होता. लक्ष्मीपूजनासाठी नांदेडकर दोन दिवसांपासूनच सज्ज झाले होते.
सविस्तर वाचा - नांदेड जिल्ह्यात चैत्यन्यमय वातावरणात लक्ष्मीपूजन; फटाक्यांची आतिषबाजी....!
सोलापूर - काल पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दिपोत्सव साजरा करण्यात आला. श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने साजरा करण्याता आलेल्या या उत्सवात विठ्ठल सभामंडप, रुक्मिणी सभामंडप, नामदेव पायरी व संपूर्ण मंदिरात ५ हजार पणती लावण्यात आल्या. त्यामुळे, विठ्ठल मंदिर सुंदर व मनमोहक दिसत होते.
सविस्तर वाचा - विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ५ हजार पणती लावून दिपोत्सव साजरा
पुणे- कोरोना संकटात देशातील धार्मिकस्थळे, मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली असली तरी देवतांचे धार्मिक विधी हे नित्य नियमाने पार पाडले जात आहेत. सध्या दिवाळीचा उत्सव साजरा होत असताना बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर मंदिरात दिवळीनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच, शिवलिंगाभोवती रांगोळी, विविध रंगांच्या फुलांनी सजावट करण्याता आली आहे. या सर्वांमुळे मदिर परिसर उठून दिसत आहे.
सविस्तर वाचा - दिवाळी निमित्त भिमाशंकर मंदिरात विद्युत रोषणाई; शिवलिंगाला फुलांचा शृंगार