मुंबई - गायक सोनू निगम याने टी सिरीज कंपनीचे मालक भूषण कुमार यांच्यावर आरोप केले होते. त्यावर आता कुमार यांच्या पत्नी दिव्या खोसला कुमार यांनी एक व्हिडिओ शेअर करून उत्तर दिले आहे.
गायक सोनू निगम याने भूषण कुमार यांच्यावर बॉलिवूडमध्ये येणाऱ्या नवोदित गायकांचे मानसिक खच्चीकरण केल्याचा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना दिव्या खोसला कुमार यांनी टी सिरीजने कंपनी स्थापन झाल्यापासून आजपर्यंत अनेक नवोदित गायकांना संधी दिली असून अनेकांना यशाच्या शिखरावर नेऊन बसवले असल्याचे सांगितले आहे. खुद्द सोनू हा देखील दिल्लीत 5 रुपये मानधनावर राम लीलामध्ये गात होता. तिथून त्यांच्यातील टॅलेंट हेरून दिवंगत गुलशन कुमार यांनी त्याला मुंबईत आणून त्याला अलबम आणि सिनेमात गाण्याची संधी दिली. मात्र, गुलशन कुमार यांचं निधन झाल्यानंतर सोनू याने परस्पर दुसऱ्या म्युझिक कंपनीसोबत करार करून केलेल्या उपकारांची जाणीव ठेवली नाही, असे दिव्या यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
- https://www.instagram.com/tv/CB0jC4hpo81/?igshid=brk11oobgjjg
भूषण कुमार यांनी टी सिरीजची धुरा आपल्या हातात घेतली तेव्हा ते फक्त 18 वर्षांचे होते. त्यांची या इंडस्ट्रीत कुणाशीच ओळख नव्हती. त्यामुळेच त्यांनी हक्काने बाळासाहेब ठाकरे, स्मिता ठाकरे, सहाराश्री सुब्रतो रॉय यांची भेट घालून देण्यास सांगितल्याचे दिव्या यांचे सांगणे आहे. मात्र, अबू सालेमपासून वाचण्यासाठी त्यांना तुमच्याकडे यावे लागले, असे तुमचे सांगणे आहे. यावरून सोनू निगमचेच अंडरवर्ल्डशी संबध असल्याचे सिद्ध होत असल्याचा दिव्या यांचा आरोप आहे.
सोनू यांनी आपल्या व्हिडिओमध्ये ज्या नवोदित अभिनेत्रीचा व्हिडिओ जाहीर करण्याचे आव्हान दिले आहे. त्यावर दिव्या यांनी 'तुझ्यात हिम्मत असेल तर तू तो व्हिडिओ जाहीर करूनच दाखव' असे आव्हान सोनू निगमला दिले आहे. 'मी टू' ही एक चांगली चळवळ असली तरीही त्या दरम्यान अनेक मुलींनी फोन करून 'आम्हाला पैसे द्या, अन्यथा आम्ही तुमचं नाव घेऊ' असे बजावले होते. मात्र, पोलीस तपासात काहीच निष्पन्न झाले नाही. त्यानंतर पोलिसांनी आम्हाला अशा मुलींवर अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा सल्लाही दिला होता. मात्र, भूषण कुमार यांनी कधीही तसे केले नाही, असे दिव्याने सांगितले.
सोनू निगम याने टी सिरीजच्या विरोधात व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर संपूर्ण जगच आमच्या विरोधात गेले आहे. सगळे आम्हाला गुन्हेगार ठरवत असून भूषण यांना जीवे मारण्याच्या, मला बलात्काराच्या आणि माझ्या मुलाला ठार मारण्याचा धमक्या सोशल मीडियावरून यायला लागल्या आहेत. त्यामुळे उद्विग्न होऊन आपण हा व्हिडिओ पोस्ट करत असल्याचे दिव्या यांनी म्हटले आहे.
सोनू स्वतः सध्या इंडस्ट्रीतील नवोदित गायकांना भडकावून टी सिरीजवर आरोप करायला सांगत आहे. मात्र, आता मी देखील कंबर कसली असून रणांगणात उडी घेतली आहे. या आरोपांबाबत आम्ही आजवर शांत होतो. मात्र, आता जशास तसे उत्तर देणार असल्याचे दिव्या यांनी या व्हिडिओच्या अखेरीस म्हटले आहे. त्यामुळे सोनू निगम विरुद्ध टी सिरीज हा वाद आता कोणत्या थराला जातो ते येत्या काही दिवसात कळेलच.