मुंबई - कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची आगळिक सुरू असून त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना दिलेला इशारा धक्कादायक आहे. अशा पद्धतीने इशारा देणे कितपत योग्य आहे. केवळ कर्नाटकच्या जनतेला चिथावणी देण्यासाठी बोम्मई विधाने करीत आहेत आणि राज्य सरकारने बोटचेपी भूमिका घेतली आहे. वास्तविक मंत्र्यांना जायला शक्य नसेल तर त्यांच्या पक्षाच्या नेते कार्यकर्ते जाऊच शकतात. त्याबद्दल का माघार घेतली जात आहे, असा प्रश्नही डॉ. निलम गोर्हे यांनी उपस्थित केला आहे.
कर्नाटक सरकार बरखास्त करा - कर्नाटक सरकारने सातत्याने मराठी माणसांवर अन्याय केला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने याचा विरोध आणि निषेध केला आहे. रक्त सांडले आहे. मात्र, मराठी माणसांवर अन्याय करणारे आणि हिंसाचाराला चिथावणी देणारे हे सरकार बरखास्त करावे, अशी मागणी करीत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले आहे. महिलांवरील अत्याचाराबाबत सरकार गंभीर नाही असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवरही टीका केली आहे. राज्यातील महिलांवर सातत्याने अत्याचार होतच आहेत. नुकतेच मुंबईतील कुर्ला येथील एका महिलेवर सामुहिक बलात्कार झाला आहे. त्याबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचे सांगत कुर्ला प्रकरणात एक आरोपी अटक झाला असला तरी अन्य आरोपींना अटक करावी, असे निर्देश दिले असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले आहे.
सीमावाद चिघळला, महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक: महाराष्ट्र आणि कर्नाटक सिमावादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत असतानाच आता पुन्हा याचा भडका उडण्याची शक्यता आहे. कारण, महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या कर्नाटक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. पुणे बंगलोर महामार्गावर ही दगडफेक झाली आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील शिवसैनिक सुद्धा आता या संतप्त प्रकरणानंतर आक्रमक होत असून आम्ही जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरे गट आक्रमक: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे. बेळगावात मंगळवारी सकाळी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले चढवले. बऱ्याच वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर मराठी भाषिकांनी संताप व्यक्त केला होता. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांनी या घटनेचा निषेध केला होता. बेळगावातील या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटले आहेत. कन्नड रक्षण वेदिकेविरोधात उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पुण्यात कर्नाटकच्या चार बसेसना काळे फासले आहे. स्वारगेट येथील लक्ष्मी नारायण चौकात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या या बसना कार्यकर्त्यांनी काळे फासून बेळगावच्या घटनेचा निषेध नोंदवला.