मुंबई Disqualification MLA Hearing : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांना प्रश्न विचारले. त्यामुळं सुनील प्रभू यांची चांगलीच कोंडी झाली. विशेष म्हणजे पहिल्या सत्रात सुनील प्रभू यांनी दिलेली साक्ष दुसऱ्या सत्रात बदलली. त्यामुळं जेठमलानी यांनी प्रभूंना याबाबत अनेक प्रश्न विचारले. संबंधित पत्र नेमकं कसं पाठवलं गेलं? असा सवाल जेठमलानी यांनी केला. सुनील प्रभू यांनी सुरुवातीला व्हॉट्सॲपवर पाठवल्याचं सांगितले. मात्र, दुसऱ्या सत्रात सुनील प्रभू यांनी आपली साक्ष बदलली. या प्रकरणाची उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.
सुनील प्रभू यांची उलटतपासणी : दिवसभरात ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांची उलटतपासणी करून त्यांची साक्ष नोंदवण्यात आली. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी प्रभू यांना उलटसुलट प्रश्न विचारले. त्यामुळं प्रभू उत्तर देताना गोंधळलेले दिसले. सुनावणीच्या पहिल्या सत्रात सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्राच्या मुद्द्यावर प्रश्नांची उत्तरे दिली.
प्रभूंनी साक्ष फिरविली : पहिल्या सत्रात सुनील प्रभू यांच्या उलट तपासणीत अपात्रतेची नोटीस व्हॉट्सॲपवरून पाठवल्याचं प्रभूंनी म्हटलं होतं. मात्र दुसऱ्या सत्रात मेलवरून नोटीस पाठवल्याचं सुनिल प्रभू म्हणाले. तसंच माझी पहिली साक्ष काढून टाकून, दुसरी साक्ष रेकॉर्डवर घ्यावी, असं विनंती प्रभूंनी यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडं केली. त्यामुळं प्रभू उत्तर देताना काहीसे गोंधळल्याचे दिसले. यावर शिंदे गटाचे वकील जेठमलानी म्हणाले की, जर तुम्ही मेलवरुन नोटीस पाठवली त्याची पत्र सादर करा. यावर बोलताना प्रभू म्हणाले की, पक्ष कार्यालय सचिवांच्या मार्फत ही नोटीस पाठवली. 'ती' नोटीस मी उद्या सादर करतो. दिवसअखेरीस सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे वकील जेठमलानी म्हणाले की, मी उद्याही प्रभूंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे.
हेही वाचा -