मुंबई - राज्यात कोरोनाला आळा घालण्याकरता दिवसरात्र एक करून काम करणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या दोन सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे येऊन मुंबई पोलिसांच्या सर्व वाहनांचे निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी घेतली आहे.
करोनाच्या युद्धात लढा देणाऱ्या योद्ध्यांना सामान्य जनतेनेसुध्दा शक्य होईल तेवढे सहकार्य केलेच पाहिजे. या भावनेतून सामाजिक संस्थांनी पण पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत २८ मे पासून मुंबईमधील सर्व पोलीस स्थानकातील पोलिसांच्या वाहनांचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम दोन संस्थांनी हाती घेतले आहे. "आम्ही गिरगावकर टीम" आणि "द हाऊस ऑफ मोटो" यांनी एकत्रितपणे येत ही जबाबदारी स्वीकारली. त्याची सुरुवात ही मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या गाडीपासून करण्यात आली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार करोना विरोधात सक्षमपणे लढा देत आहेत. त्यांच्या सोबत डॉक्टर, नर्सेस, पालिका कर्मचारी व कर्तव्यनिष्ठ असे आपले पोलीस बांधवदेखील खांद्याला खांदा लावून कोरोना युद्धात सामील झालेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील सर्व वाहनांचे निर्जंतुकिकरण करण्यात आले. तर, पुढील 15 दिवसात मुंबईमधील सर्व पोलीस स्थानकातील पोलीस बांधवांच्या सेवेतील वाहने निर्जंतुकीकरण करण्याचे या दोन्ह संस्थाचे उद्दिष्ट आहे. ह्याचा पहिला टप्पा दक्षिण मुंबई विभागापासून सुरू करण्यात आला.