मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारातील गर्दी टाळण्यासाठी क्रक्स रिक्स मॅनेजमेंट कंपनीच्यावतीने संपूर्णपणे निर्जंतुकीकरण केलेली पॅकबंद भाजी व फळे एका भ्रमणध्वनीवर संपूर्ण मुंबईत आपल्याला घरपोच मिळणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी किशोरी पेडणेकर यांनी दिली.
क्रक्स रिक्स मॅनेजमेंट कंपनीच्या संचालकांनी मीना कांबळी यांच्या नेतृत्वात महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या महापौर निवासस्थानी आज(मंगळवार) भेट घेऊन सादरीकरण केले. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर बोलत होत्या. 'भाजीची गाडी आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत निर्जंतुकीकरण केलेली भाजी थेट शेताच्या बांधावरून आपल्याला घरपोच मिळणार असल्याचे महापौर यांनी सांगितले. दिंडोरी येथील प्रकल्पावर संकलित करण्यात आलेल्या भाजीचे इथेनॉलव्दारे संपुर्ण निर्जंतुकीकरण करून पॅकबंद भाजी दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे.
मुंबईतील संकुलातील मंडळी ग्रुप बुकिंग करून आपल्या मालाची मागणी ९९८७७३६१०३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून नोंदवू शकणार आहेत. 'ना नफा-ना तोटा' या तत्वावर ही संस्था काम करणार आहे. त्यामुळे, बाजारातील गर्दी टाळून इतरांशी संपर्क न येता घरपोच भाजी उपलब्ध होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेना उपनेत्या मीना कांबळी, माजी नगरसेविका मीनल जुवाटकर, मातोश्री बचत गट महासंघाच्या संचालिका गायत्री आवलगावकर, कंपनीचे संचालक नाशिक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश वडणे पाटील, वीरेंद्र पाल हे मान्यवर उपस्थित होते.