मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आज (मंगळवारी) इंडिया बुल याठिकाणी भेट झाली. दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून येत्या काही दिवसांमध्ये राज्यात नवीन राजकीय समिकरणांची नांदी पाहायला मिळणार असल्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा - मुंबईत झळकलेल्या 'फ्री काश्मीर' फलकाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः मॉनिटरींग करावे - चंद्रकांत पाटील
मनसेला विधानसभा निवडणुकीमध्ये आलेल्या अपयशामुळे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे आगामी काळामध्ये नवीन रणनिती आखण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. येत्या 23 जानेवारीला गोरेगावमधील नेस्को येथे होणाऱ्या मनसेच्या महाअधिवेशनात मनसेचा झेंडा बदलण्यात येणार आहे. सध्याच्या मनसेच्या झेंड्यात निळा, भगवा, पांढरा आणि हिरवा असे रंग आहेत तर मध्ये पक्षाचं चिन्ह असलेलं इंजिन आहे. नव्या झेंड्यात सर्व चारही रंग जाणार असून फक्त भगवा रंग असणार आहे आणि मध्यभागी 'शिवराजमुद्रा' असणार आहे. हा बदल म्हणजे मनसेची हिंदुत्वाकडे असलेली वाटचाल असल्याचं म्हटलं जात आहे.
आजच्या फडणवीस व राज ठाकरे भेटीनंतर मनसे आणि भाजप यांच्यातील समीकरण पाहायला मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी सोबत महाआघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे मनसे हा पक्ष हिंदुत्वाच्या मुद्याच्या आधारे येणाऱ्या काळात आपली वाटचाल करणार आहे. या मुद्द्यांना पाहता भाजपाला नवीन मित्र भेटणार का याबाबतची उत्सुकता आता लागली आहे.
शिवसेना नेते व कॅबीनेट मंत्री सुभाष देसाई यांनी या भेटीवर मात्र खरमरीत टीका केली आहे. ते म्हणाले, 'ज्यांच्याकडे सध्या काहीच उद्योग उरले नाहीत त्यांना गाठी भेटी करू द्या, आम्ही मात्र राज्याला प्रगतीकडे घेऊन जाणार आहोत.'
हेही वाचा - 'हे फसवं सरकार, वरपासून खालपर्यंत सगळेच खोटारडे', अनुराग कश्यप भडकला