मुंबई - महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडील नगरविकास खात्याच्या 'निर्णय न झालेल्या' तब्बल अडीच हजार फाईल्स म्हणजेच धारिका किंवा संचिका सुमारे ३ महिने मूळ नगरविकास विभागाकडे हस्तांतरितच झाल्या नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. (Urban Development Department files). ३ महिन्यानंतर सप्टेंबरमध्ये तत्कालीन मंत्री आस्थापनेवरील विशेष कार्य अधिकाऱ्याने नगरविकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पत्र पाठवून यासंदर्भात माहिती दिली.
का अडकल्या फाइल्स? - तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १० जून २०२२ रोजी सामान्य प्रशासन विभागाने पत्राद्वारे सर्व मंंत्र्यांकडील मंत्रालयीन आस्थापनांना त्यांच्याकडील कागदपत्रे, नोंदवह्या, फाईल्स इत्यादी सर्व मूळ विभागांकडे परत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तथापि तत्कालिन मंत्री मंडळातील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हेच नूतन मुख्यमंत्री म्हणून नियुक्त झाल्याने व नूतन मुख्यमंत्री यांच्याकडेच नगर विकास विभागाचा कार्यभार राहणार असल्यामुळे मंत्री आस्थापनाने 'निर्णय न झालेल्या' या सर्व धारिका स्वतःकडे राखून ठेवाव्यात मूळ विभागाकडे म्हणजे नगर विकास विभागाकडे परत न करण्याचा धोरणात्मक पण तोंडी निर्णय घेतला होता. याबाबत नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव यांचे खाजगी सचिव व इतर संबंधित यांना ही माहिती देण्यात आली होती, असे संबंधित पत्रात म्हटले आहे.
गोहिल यांच्या रखडलेल्या नियुक्तीमुळे अडचण - तत्कालिन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे तत्कालिन विशेष कार्य अधिकारी तथा उपसंचालक, नगर रचना प्र ल गोहिल यांच्याकडे या फाईल्स होत्या. नूतन मुख्यमंत्री कार्यालयात जुन्या अधिकारी व कर्मचारी यांच्याही सेवा कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी आजही मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत आहेत. मात्र असे असले तरी अद्यापही गोहिल यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती प्रशासकीय आदेशाच्या प्रतीक्षाधिन आहे. त्यामुळे गोहिल यांना नेमके काय करावे? हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाच्या हिताच्या दृष्टीने त्यांच्याकडील या प्रलंबित फाईल्स सध्यस्थितीत कोणाकडे हस्तांतरीत कराव्यात याबाबत आदेश द्यावेत अशी विनंती गोहिल यांनी नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव भुषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तब्बल ३ महिन्याहून अधिक काळ सुमारे अडीच हजार फाईल्स मूळ विभागांकडे परत न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा - दरम्यान तब्बल तीन महिन्यांपासून पडून असलेल्या या अडीच हजार फाईल्स बाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने खुलासा करावा. नेमक्या कोणत्या कारणासाठी या फाइल्स वर निर्णय घेण्यात आला नाही याची कारणे जनतेसमोर स्पष्ट व्हायला हवीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
तपासे यांनी आधी अभ्यास करावा - दरम्यान या संदर्भात बोलताना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडेच नगरविकास खाते आजही आहे. त्यामुळे त्या फाइल्स तिथेच आहेत. त्या कुठेही गायब झालेल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांवर काहीतरी बोलायचं म्हणून तपासे बोलत आहेत. त्यांनी थोडा अभ्यास करावा आणि त्यानंतर टीका करण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला बोलायला मिळत नाही म्हणून काहीतरी विषय काढत आहात. याबाबत थोडासा तरी अभ्यास करावा अस प्रत्युत्तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी तपासे यांना दिले आहे.