मुंबई - 'सिंधुदुर्गाचा विचार करता बाहेरचा उमेदवार आयात करण्याची सध्या गरज नाही. सेनेला विश्वासात घेतल्याशिवाय राणेंबाबत निर्णय होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे राणे वेटिंगवरच राहतील', असा टोला राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणेंना लगावला आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केसरकर म्हणाले, "नारायण राणे हे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी काय करावे हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे. सिंधुदुर्गाचा विचार करता कणकवलीची जागा भाजपकडे असते. उर्वरीत दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत. बाहेरचा उमेदवार आयात करण्याची सध्या गरज वाटत नाही. राणेंना आयुष्यात कधीच इतके वेटिंगकरावे लागले नसेल. माजी मुख्यमंत्री असलेले राणे आता त्यांचा पक्ष संपण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर, स्थिर सरकार राज्याला विकासाकडे नेत आहे."
आदित्य ठाकरेंकडे सगळेच आशेने बघत असून ते भविष्यातील मुख्यमंत्री आहेत, असा केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. आदित्य जनतेमध्ये जाऊन आशिर्वाद घेत आहेत. मुख्यमंत्र्याचाही दौरा सुरु आहे. याचा फायदा युतीला होईल, अशी खात्री असल्याचेही केसरकर म्हणाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी पराभव केला होता. तर, वर्षभराने झालेल्या वांद्रे पोटनिवडणुकीत नारायण राणे यांना शिवसेनेच्याच तृप्ती बाळा सावंत यांनी हरवले होते.