मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाच्या निषेर्धात भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेस भवनावर मोर्चा काढत माफी मागण्याची मागणी केली. यावेळी आव्हाड यांच्या प्रतिकात्मक फोटोला 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीनेही भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपच्या कार्यालयावर धडक दिली. सकाळपासून वातावरण तापले आहे. शिंदे गटाचे प्रसार माध्यम समन्वयक दिनेश बबनराव शिंदे यांनी माजी मंत्री आव्हाड यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.
आत्मचिंतन करावे : आव्हाड सतत वादग्रस्त विधाने करून अकलेचे तारे तोडतात. मागे विधानभवनात 'यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत', हा श्लोक म्हणताना तोंडावर पडले होते हे सर्वश्रुत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते प्रभू राम, श्रीकृष्ण यांच्याबाबत विधाने करत आहेत. इतिहासात डॉक्टरेट झालेल्या आव्हाडांना आता श्रीराम, कृष्णाचा विसर पडावा. सत्ता गेल्यापासून त्यांची मानसिकता ढासळली आहे. त्या उद्धवेगीतून ते अशी वैफल्यग्रस्त प्रतिक्रिया येत आहेत. आव्हाडांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला ही दिनेश शिंदे यांनी दिला. यासह आव्हाडांना आता हिंदुत्वाची आठवण झाली. ते बांगलादेशी नागरिक आहेत का? त्यांच्या इथे भरवल्या जाणाऱ्या दहिहंडी उत्सवात परदेशातील लोक येतात. आव्हाडांवर त्याचा परिणाम तर झाला नाही ना? तसे असेल तर त्यांनी हिंदूत्व समजून घ्यावे, असा चिमटासुद्धा दिनेश शिंदे यांनी काढला.
निषेधासाठी पुढे येऊ : बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप हे दोन्ही हिंदुत्वाच्या विचाराचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. दोन्ही पक्षांचा पाया हिंदुत्व आहे. रामायण आणि महाभारत ही दोन पुराणे हिंदूंसाठी पूज्यनीय आहेत. प्रभू श्रीराम असो किंवा श्रीकृष्णाच्या विरोधात वक्तव्य होईल, तेव्हा उत्स्फूर्तपणे नैसर्गिकरित्या आम्ही नकारात्मक गोष्टींचा निषेध करण्यासाठी पुढे येऊ, असा इशारा देखील शिंदे गटाकडून देण्यात आला.
जीभ छाटणाऱ्याला 10 लाखांचे बक्षीस : आव्हाड यांच्या विरोधात भाजपकडून राज्यभरात आंदोलन केले जात आहेत. भाजप ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी राज्यातील जनतेला जितेंद्र आव्हाड दिसतील, तिथे त्यांची जीभ छाटावी. जो जीभ छाटेल त्याला १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. हा वाद यामुळे अधिक चिघळणार आहे.