मुंबई : वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील धीरूभाई अंबानी शाळेत बॉम्बची धमकी दिल्याबद्दल विविध अंतर्गत बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काल संध्याकाळी साडेचारच्या सुमारास शाळेला धमकीचा फोन आला होता. कॉलरची ओळख पटल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे; मात्र अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसून लवकरच त्याच्या मुसक्या आवळण्यात येतील असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
रिलायन्स रुग्णालय उडविण्याची होती धमकी : धीरूभाई अंबानी शाळेच्या तक्रारीच्या आधारे, अज्ञात कॉलरविरुद्ध बीकेसी पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम ५०५ (१) (बी) आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी फोन करणार्याचा शोध घेतला असून लवकरच आरोपीला अटक करणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये डी बी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये धमकीचा कॉल आला होता. त्यावेळी अज्ञात कॉलरने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी दिली आणि तसेच अंबानी परिवाराला जीवे मारण्या्ची धमकी दिली होती. याप्रकरणी डी बी मार्ग पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.
प्रसिद्धीसाठी कॉल केल्याचा संशय : धीरूभाई अंबानी शाळेला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर बीकेसी पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे. दाखल एफआयआरनुसार, कॉलरने स्वत:ची ओळख विक्रम सिंह अशी सांगितली आहे. त्याने शाळेच्या लँडलाइन नंबरवर कॉल केला आणि सांगितले की, त्याने शाळेच्या आत टाइम बॉम्ब पेरला आहे आणि कॉल डिस्कनेक्ट केला. प्रसिद्ध होण्यासाठी धमकी दिल्याचे बोलले जात आहे.
गुजरामधून बोलत असल्याचा दावा : कॉलरने सांगितले की, सोशल मीडियावर त्याचे नाव असेल आणि जर तो पकडला गेला तर अंबानी कुटुंबाला लक्ष्य करेल. फोन करणाऱ्याने तो गुजरातमध्ये असल्याचा दावा केला. फोन करणार्याने स्वतःची ओळख विक्रम सिंह अशी सांगितली आहे.