मुंबई- गजबलेल्या धारावीत हजारो रहिवासी आणि पादचाऱ्यांना हक्काने चालण्यासाठी जागा मिळावी यासाठी धारावी ते माहीम स्थानक असा स्कायवॉक बांधण्याचे ठरले आहे. ६० फूट मार्गावरील स्कायवॉक गेली ६ वर्षे रखडला आहे. माहीम स्थानकास जोडणारा हा स्कायवॉक २०१९ संपत आला तरीही पूर्णत्वास गेलेला नाही. एमएमआरडीएने दिलेल्या निधीतून म्हाडाकडून हा स्कायवॉक बांधला जाणार आहे. पण पश्चिम रेल्वेकडून अद्यापही 'ना हरकत प्रमाणपत्र' मिळालेले नसल्याने स्कायवॉकचा केवळ एकच टप्पा पूर्ण झाला. दुसरा टप्पा अद्यापगी बाकी असल्याने तो तातडीने पूर्ण करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा- शिवसेनेबाबत सोनिया गांधींशी कोणतीही चर्चा झाली नाही - शरद पवार
स्कायवॉक पूर्ण झाला तर माहीम रेल्वे स्थानकातून थेट धारावीत जाण्याचा मार्ग नागरिकांना उपलब्ध होणार आहे. धारावीत असलेली गर्दी कमी होण्याच्या दृष्टीने हा स्कायवॉक उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी २०१३ मध्ये स्कायवॉक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची जबाबदारी म्हाडावर सोपविण्यात आली. या गजबजलेल्या ठिकाणी स्कायवॉक बांधणे कठीण असल्याने त्याची जबाबदारी घेण्याची तयारी अन्य यंत्रणा घेण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे ती जबाबदारी म्हाडावर सोपविली गेली. त्यासाठी एमएमआरडीएने देखील निधी दिला.
या निधीतून मे २०१५ मध्ये धारावीतील अभ्युदय बँक ते सेक्टर तीनमध्ये पहिल्या टप्प्यात २९४ मीटर लांबीचा स्कायवॉक बांधला. त्याचा पूर्ण क्षमतेने वापर न झाल्याने त्यास माहीम स्थानकापर्यंत नेण्याचे ठरविण्यात आले. त्यात हा स्कायवॉक माहीम रेल्वे स्थानकातील पादचारी पुलास जोडला जाईल, अशी योजना आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच स्कायवॉकवरुन धारावीत जाता येऊ शकते. पण हा टप्पा पूर्ण न झाल्याने धारावीवासीयांचे हाल होत आहेत.