मुंबई - शहरातील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतील रुग्णांची संख्या आता हळूहळू कमी होत आहे. मात्र, त्याचवेळी धारावी लगतच्या माहीममध्ये कोरोनाचा कहर वाढत आहे. तेव्हा धारावीतील कोरोनाचा कहर कमी करण्यासाठी जो क्लिनिक-स्क्रिनिंग पॅटर्न राबवला गेला तोच पॅटर्न माहीममध्ये राबवण्यात येण्याची शक्यता आहे. धारावी-माहीम मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनने यादृष्टीने विचार सुरू केला असून लवकरच हा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेसमोर ठेवला जाणार आहे.
धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर पालिकेने खासगी डॉक्टरांच्या अर्थात असोसिएशनच्या मदतीने डोअर टू डोअर स्क्रिनिंग मोहीम राबविली. यात 40 हजार धारावीकरांचे स्क्रिनिंग केले. शेकडो संशयित रूग्ण शोधून काढले. हजारोंच्या संख्येने लोकांना क्वारंटाईन केले. मात्र, गल्लीबोळातून पीपीई किट घालून फिरणे डॉक्टरांना अशक्यप्राय होऊ लागले. त्यातच या मोहिमेतील तीन डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ही मोहीम तात्काळ बंद करत असोसिएशनने धारावीतील आपले सर्व क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. तर, पालिकेने डॉक्टर-आरोग्य सेविकांना पीपीई किटसह इतर मदत दिली. त्यानुसार क्लिनिक सुरू करत सर्व रुग्णांना तपासण्यास सुरवात केली.
स्क्रिनिंगमध्ये या डॉक्टरांनी मोठ्या संख्येने संशयित रूग्ण शोधून काढले. पालिकेने त्यांना वेळेत क्वारंटाईन केल्याने आता धारावीतील रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे. आजच्या घडीला धारावीत 150 हून अधिक खासगी क्लिनिक सुरू आहेत. एकूणच धारावीत क्लिनिक-स्क्रिनिंग पॅटर्न यशस्वी ठरला असून हाच पॅटर्न आता माहीममध्ये राबवणे गरजेचे आहे. त्यानुसार विचार सुरू असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र शिंगणापूरकर यांनी दिली आहे.
पुढे शिंगणापूरकर म्हणाले, सरकारने खासगी डॉक्टरांना मोफत पीपीई किट देण्याचे जाहीर केले आहे. पण अजून धारावी सोडली तर कुठेही खासगी डॉक्टरांना मोफत पीपीई मिळत नाहीत. परिणामी माहीममधीलच आमच्या असोसिएशनचे 4 डॉक्टर कोरोनाबाधित झाले आहेत. तेव्हा माहीममध्ये कोरोनाला रोखायचे असेल तर क्लिनिक-स्क्रिनिंग पॅटर्न उपयोगी ठरेल. पण त्यासाठी मोफत पीपीई किट उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यानुसार माहीममध्येही अशी मोहीम सुरू करण्यासाठी लवकरच आम्ही पालिकेशी चर्चा करू, असेही डॉ शिंगणापूरकर यांनी सांगितले आहे. माहीममध्ये अंदाजे 150 खासगी क्लिनिक आहेत. हे सुरू झाल्यास नक्कीच त्याचा फायदा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.